अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज, अहिल्यानगरला शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १०० एमबीबीएस प्रवेशक्षमतेची मंजुरी मिळावी,

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज, अहिल्यानगरला शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १०० एमबीबीएस प्रवेशक्षमतेची मंजुरी मिळावी, यासाठी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) महाविद्यालयाला मंजुरी नाकारल्यानंतर आणि प्रथम अपील फेटाळल्यानंतर या निर्णयाचा पुनर्विचार करून राज्य सरकारने पूर्ण केलेल्या त्रुटींची नव्याने तपासणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे. निवेदनात खासदार लंके यांनी नमूद केले आहे की, अहिल्यानगर हा राज्यातील मोठ्या लोकसंख्येचा जिल्हा असून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अत्यंत आवश्यक आहे. या महाविद्यालयामुळे अहिल्यानगरसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. एनएमसीने निदर्शनास आणलेल्या प्राध्यापकांची उपलब्धता, पायाभूत सुविधा, एईबीएएस नोंदणी, क्लिनिकल साहित्य आणि इतर वैधानिक बाबींशी संबंधित उणिवा दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली असून त्या अल्पावधीत पूर्ण होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तातडीने पुनर्विचार करून एनएमसीमार्फत नव्याने पाहणी करावी, आवश्यक असल्यास तज्ज्ञ समितीकडून ताजे निरीक्षण करावे, राज्य शासनाने सादर केलेल्या अनुपालन अहवालाची तपासणी करून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १०० एमबीबीएस जागांना मंजुरी द्यावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या प्रकरणाचा प्राधान्याने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

COMMENTS