नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेले कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनावर सोमवारी पोलिसांनी कारवाई करत आंदोलनाचे व्यासपीठ रिकामे केले
)
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेले कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनावर सोमवारी पोलिसांनी कारवाई करत आंदोलनाचे व्यासपीठ रिकामे केले आणि उभारलेले तंबू हटवले. आंदोलकांना तेथून हटविण्यात आले असून, या कारवाईदरम्यान लाठीमार आणि अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पक्षाने अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी सुरक्षा अडथळे हटवत संसदेच्या दिशेने मोर्चा वळविल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र काही आंदोलक संसदेच्या परिसराच्या जवळ पोहोचले. आंदोलकांनी संसदेच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर संसदेच्या परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यानंतर पोलिसांच्या कारवाईमुळे जमाव विखुरला. या संपूर्ण घडामोडीदरम्यान पंतप्रधानांसह सर्व खासदार संसद भवनात उपस्थित होते.
आंदोलकांचा मोठा समूह संसद परिसराच्या दिशेने निघाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी सुरक्षा बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. काही ठिकाणी सौम्य लाठीमारही करण्यात आला. या गोंधळामुळे संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आणि मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद करण्यात आले. संसदेच्या कामकाजादरम्यान पंतप्रधानांसह सर्व खासदार सभागृहात उपस्थित असताना बाहेर आंदोलन सुरू होते. सुरक्षा यंत्रणांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. सकाळच्या सत्रात काही आंदोलक राजीव चौक आणि मंडी हाऊस मेट्रो स्थानक परिसरात पोहोचले. काहींनी सुरक्षा बंधारे हटवून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याच्या दिशेने जाण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अभिजीत दीपके यांनी आपले उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. सरकारशी चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांना पुढील निर्णय होईपर्यंत आंदोलन स्थगित ठेवण्याचे आवाहन केले. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली.
शिष्टमंडळाने घेतली जे. पी. नड्डा यांची भेट
नीट प्रश्नपत्रिका गळती प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दहा मिनिटे झालेल्या चर्चेत पक्षाच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सादर करण्यात आले.पक्षाचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती दिली. दास यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात सांगितले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या विषयावर योग्य स्तरावर चर्चा केली जाईल, असे आश्वासन नड्डा यांनी दिले.

COMMENTS