Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाने नांदेड शहराला झोडपले; रस्ते जलमय, होर्डिंग्ज कोसळली, वीजपुरवठा खंडित

नांदेड : उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळणार्‍या नांदेडकरांना रविवारी रात्री अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी या पावसाने शहरातील जनजीवनही

मान्सूनपूर्व पावसाचा कोपरगाव, नेवाशाला तडाखा; शेतीचे नुकसान; वीजपुरवठा खंडित; झाडे कोलमडली
बेंगळुरूमध्ये गारांचा पाऊस; तळपत्या उन्हात शहराला काश्मीरचे स्वरूप
वादळग्रस्त नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : आ. काळे
नांदेड शहराला अवकाळी पावसाने झोडपले; तुंबलेल्या नाल्यांमुळे शहरभरातील  रस्त्यांवर साचले पाणी, वीजपुरवठाही गुल, शहर अंधारात | गोदातीर समाचार

नांदेड : उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळणार्‍या नांदेडकरांना रविवारी रात्री अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी या पावसाने शहरातील जनजीवनही विस्कळीत केले. वादळी वार्‍यासह कोसळलेल्या तुफान पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले, तर विविध चौकांतील होर्डिंग्ज व बॅनर रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले असून एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
हवामान विभागाने यापूर्वीच भारत मौसम विज्ञान विभाग कडून नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला होता. रविवारी दुपारपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. दिवसभर प्रचंड उकाडा आणि ढगाळ हवामान यामुळे पावसाची चिन्हे स्पष्ट दिसत होती. रात्री सुमारे 10.30 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर सुरू असलेल्या या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. गत काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. उष्णतेमुळे दिवसभर रस्त्यांवर वर्दळ कमी झाली होती. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने उकाड्यातून तात्पुरता दिलासा दिला. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील निचरा व्यवस्था पुन्हा एकदा उघडी पडली. अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि महामार्गालगत उभारण्यात आलेली अनेक मोठी होर्डिंग्ज वार्‍याच्या वेगाने कोसळली. काही बॅनर विजेच्या तारांवर अडकले, तर काही थेट रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने धोकादायक होर्डिंग्ज हटवावीत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे आधीच विजेची मागणी वाढलेली असताना या पावसामुळे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. काही जनित्रांवर ताण आल्याने पुरवठा बंद पडल्याचे सांगण्यात आले. परिणामी अनेक भाग अंधारात गेले. सोमवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण कायम होते. उन्हाची तीव्रता काहीशी कमी असली तरी हवेत प्रचंड उकाडा आणि चिकटपणा जाणवत होता. हवामान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS