Homeताज्या बातम्या

मोझतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत संभ्रम कायम

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोझतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध दावे केले जात असतानाच इराणकडून त्यांची नवी चित्रफि

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे ५ जणांचा मृत्यू; आसाममध्ये पुराचा हाहाकार, बळींचा आकडा ६१ वर
मॉली समदडियाची राष्ट्रीय योग स्पर्धेसाठी निवड
नांदेड शहरामध्ये मसज सेंटरच्या नावाखाली कथित कुंटणखाना; पोलिसांचा छापा, एकास अटक, चार महिलांची सुटका
मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्क; इराणकडून नवीन व्हिडिओ समोर -  Hindusthan Samachar Marathi

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोझतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध दावे केले जात असतानाच इराणकडून त्यांची नवी चित्रफित प्रसिद्ध करण्यात आली आहे. या चित्रफितीत मोझतबा खामेनेई काही व्यक्तींसोबत बैठकर चर्चा करताना दिसत असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे चित्र यातून उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

इराणशी संबंधित अर्धसरकारी वृत्तसंस्थेने ही चित्रफित प्रसिद्ध केली आहे. मात्र, ती नेमकी कधीची आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रफितीच्या आधारे त्यांच्या सध्याच्या प्रकृतीबाबत निश्चित निष्कर्ष काढणे शक्य नाही. तसेच चित्रफितीची स्वतंत्रपणे सत्यता पडताळण्यात आलेली नसून त्यामध्ये दिसणारी व्यक्ती मोझतबा खामेनेईच असल्याची अधिकृत पुष्टीही झालेली नाही. यापूर्वी इस्रायलमधील माध्यमांनी मोझतबा खामेनेई यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे वृत्त दिले होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच ते सध्या नेमके कुठे आहेत, याबाबतही चर्चा सुरू झाली होती. अशा परिस्थितीत इराणकडून नवी चित्रफित समोर आल्याने या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांचा २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईत मृत्यू झाल्यानंतर काही काळाने मोझतबा खामेनेई यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर ते अद्याप सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. त्यांच्या वतीने प्रामुख्याने लिखित निवेदनाद्वारे संदेश प्रसिद्ध केले जात आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, लष्करी हल्ल्यादरम्यान मोझतबा खामेनेई जखमी झाले होते. त्यानंतर इराणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांना मध्यस्थांच्या माध्यमातून संपर्क ठेवावा लागत असल्याचे दावे करण्यात आले आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनीही त्यांच्या प्रकृतीबाबतच्या संभ्रमात भर घातली आहे. सरकारी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोझतबा खामेनेई यांच्याशी सध्या थेट संपर्क साधणे अत्यंत कठीण असल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांना तेहरानमधील एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. तिथे त्यांची भेट मोझतबा खामेनेई असल्याचे सांगण्यात येणाऱ्या व्यक्तीशी घडवून आणल्याचा दावा करण्यात आला. या घटनेमुळे इराणच्या नव्या नेतृत्वाभोवती असलेले गूढ आणि गोपनीयता आणखी वाढली आहे. नव्या चित्रफितीमुळे मोझतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबतचे काही दावे कमकुवत होत असले, तरी चित्रफितीची तारीख आणि सत्यता स्पष्ट नसल्याने त्यांच्या सध्याच्या आरोग्यस्थितीबाबत अंतिम निष्कर्ष काढणे अद्याप घाईचे ठरणार आहे.

देशाबाहेर असल्याच्या चर्चेलाही उधाण जुलै महिन्यात सौदी अरेबियातील एका वृत्तसंस्थेने इस्रायली सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने मोझतबा खामेनेई इराणमध्ये नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या सर्वोच्च लष्करी नेतृत्वाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला होता. लष्करी कारवाईनंतर खामेनेई यांची व्यवस्था मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली असून ते प्रभावीपणे काम करण्याच्या स्थितीत नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते.

COMMENTS