Homeताज्या बातम्या

‘गर्भलिंग’ प्रकरणी दोघांना अटक, आरोपींची संख्या २१ वर

अहिल्यानगर : लोणी येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या तपासात नवनवे धागेदोरे समोर येत असून पोलिसांनी आणखी दोघ

धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस कारावास व दंडाची शिक्षा; अहिल्यानगर न्यायालयाचा निर्णय
खरवंडी परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची स्थापना करावी : आव्हाड
शिर्डी-नाशिक महामार्गावर बस-कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, १५ जखमी


अहिल्यानगर : लोणी येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या तपासात नवनवे धागेदोरे समोर येत असून पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अटक आरोपींची संख्या आता २१ वर पोहोचली असून त्यामध्ये सात डॉक्टरांचा समावेश आहे.
या प्रकरणात सुरुवातीला नेवासातील एका डॉक्टरसह दोन मध्यस्थ आणि सहा नातेवाइक अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी एक सोनोग्राफी यंत्र आणि तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी आणखी एका आरोपीकडून दुसरे चलत सोनोग्राफी यंत्र जप्त केले तसेच अनेक मध्यस्थांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान श्रीरामपूर येथील दोन डॉक्टरांना गर्भलिंग निदान चाचण्या व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे येथील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य विक्रीशी संबंधित एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली. वडगाव मावळ येथील एका आरोपीकडून गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे यंत्र जप्त करण्यात आले.
पुढील तपासात पुण्यातील आरोपींकडून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एका डॉक्टरने बेकायदेशीररीत्या सोनोग्राफी यंत्र खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संबंधित डॉक्टर व एका औषध विक्रेत्याला ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान, घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथील औषध विक्रेता जालिंदर बोरुडे यालाही अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने अनेक गर्भवती महिलांच्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या मलठण (ता. कर्जत) येथील राम पवार उर्फ तपोश सरकार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात पुण्यातील आणखी एका डॉक्टरचा सहभाग उघड झाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. संबंधित डॉक्टर बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या करत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने त्यालाही सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
चौकट
अनेकांचा सहभाग
आतापर्यंतच्या तपासात पाच सोनोग्राफी यंत्रे, चार चारचाकी वाहने आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहेत. या गुन्ह्यात सात डॉक्टर, तीन औषध विक्रेते आणि वैद्यकीय साहित्य पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या पुरवठादाराचा सहभाग उघड झाला आहे. अटक आरोपींची संख्या आता २१ वर पोहोचली आहे.

COMMENTS