वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा करत पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याच्या दृ
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा करत पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचा दावा केला आहे. अमेरिकेकडून इराणवर कोणतेही नवे हल्ले केले जाणार नसल्याचे स्पष्ट करत, संबंधित देशांमध्ये संघर्ष समाप्त करण्यासाठी तत्वतः सहमती झाल्याचे त्यांनी सांगितले. या घोषणेमुळे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला विराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांनी समाजमाध्यनावरील संदेशातून सांगितले की, पश्चिम आशियातील काही मित्रदेशांनी इराणशी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी कराराच्या आराखड्याला पाठिंबा दर्शविला आहे. या घडामोडींमुळे सध्या तरी अमेरिकेकडून कोणतीही नवी लष्करी मोहीम राबवण्यात येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांच्या मते, प्रस्तावित करारात दोन प्रमुख बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे:
- होर्मुझ सामुद्रधुनी: सर्व जहाजांसाठी तातडीने आणि पूर्णपणे खुली करणे.
- अण्वस्त्र कार्यक्रम: इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित धोका कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे.
या संदर्भात ट्रम्प म्हणाले की, “जगाच्या हिताचा आणि स्थिर व समृद्ध इराणच्या भविष्यासाठी मी सध्या लष्करी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, यासाठी संबंधित करार लवकरात लवकर अंतिम होणे आवश्यक आहे.” इस्रायलने अमेरिकेशोबत समन्वय साधून इराणबरोबरचा प्रस्तावित करार पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.
या निर्णयापूर्वी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. या चर्चेत त्यांनी इराणविरोधातील संभाव्य अमेरिकन लष्करी कारवाईबाबत चिंता व्यक्त केली होती.
ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची भीती
सौदी अरेबियाची मुख्य चिंता अशी होती की, अमेरिकेने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर किंवा इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केल्यास इराण त्याला प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांतील तेल, वायू आणि ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करू शकतो. अशा परिस्थितीत संपूर्ण प्रदेशातील ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. अमेरिकेने इराकमधील इराणसमर्थक सशस्त्र गटांच्या रसद आणि शस्त्रसाठा केंद्रांवर केलेल्या कारवाईला सौदी अरेबियाने पाठिंबा दिला होता, मात्र त्याचवेळी अमेरिका आणि इराणने थेट संवाद साधून वाद मिटवावा, अशी भूमिका रियाधने सातत्याने मांडली होती.
नेतान्याहू यांचीही ट्रम्प यांच्याशी चर्चा
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचीही भेट घेतली. इराणविरोधातील संघर्ष सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट होती. या चर्चेदरम्यान नेतान्याहू यांनी इराणविरोधातील लष्करी दबाव कायम ठेवण्याची भूमिका मांडल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत इराणविरोधात कठोर भूमिका घेतलेल्या ट्रम्प यांनी अचानक संघर्ष थांबवण्याची घोषणा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

COMMENTS