बीड जिल्ह्यातील टपाल सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय संचार मंत्री ज्य

बीड जिल्ह्यातील टपाल सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य एम.शिंदे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील टपाल यंत्रणेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आणि विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक विस्तृत मागणीपत्र केंद्रीय मंत्र्यांना सोपवले. केंद्रीय मंत्री शिंदे यांनी देखील या सर्व मागण्यांची अत्यंत सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकार्यांमार्फत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आणि प्रस्तावांवर प्राधान्याने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
खा.बजरंग सोनवणे यांनी पत्राद्वारे केंद्रीय मंत्र्याकडे मांडलेल्या प्रमुख मागण्यामध्ये जीर्ण झालेल्या पाटोदा, गेवराई आणि परळी येथील विभागीय टपाल कार्यालयांच्या इमारती पाडून तेथे सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त नवीन प्रशस्त इमारती उभारण्यात याव्यात. केज येथील उपटपाल कार्यालयासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी विभागीय इमारतीच्या बांधकामास तात्काळ मंजुरी द्यावी. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी बीड विभागीय टपाल कार्यालय बीड मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे. अंबाजोगाई आणि परिसरातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी तेथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये ’पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र’ सुरू करण्यात यावे. मादळमोही येथील शाखा टपाल कार्यालयाचे उपटपाल कार्यालयात रूपांतर करून सेवा क्षमता वाढवावी, तसेच केज तालुक्यातील आनंदगाव येथे नवीन शाखा टपाल कार्यालयास मंजुरी देऊन ग्रामीण भागातील टपाल सेवा अधिक सुलभ करावी. बीड जिल्ह्यातील टपाल यंत्रणेचे संपूर्ण डिजिटायझेशन, पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरिकाभिमुख सेवांच्या विस्तारासाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा. ’डिजिटल इंडिया’ आणि ’भारतनेट’ योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हाय-स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय व टपाल सेवा वेळेत आणि सुलभतेने मिळाव्यात, यासाठी टपाल विभागाचा कायापालट करणे अत्यंत गरजेचे असल्याचे खा.सोनवणे यांनी यावेळी नमूद केले. यावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच जिल्ह्यातील टपाल सेवांचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन दिले.

COMMENTS