महाविकास आघाडीतील फूट ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीतील फूट ?

राज्यात जनभावनेचा आदर पायदळी तुडवत तब्बल अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार त्याच लोकभावनेतून कोसळले असून, या आघाडीला फुटीचे ग्रह

भारत-कॅनडा संबंधात वितुष्ट
महायुतीमध्ये जागावाटपावरून ठिणगी
भाजप सत्ता आणि वाद

राज्यात जनभावनेचा आदर पायदळी तुडवत तब्बल अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार त्याच लोकभावनेतून कोसळले असून, या आघाडीला फुटीचे ग्रहण लागले आहे. अर्थात या फुटीला लाथाळया, बंडाळी असे शब्दप्रयोग करून थकलेली शिवसेनाच कारणीभूत असल्याचे काँगे्रसच्या नाराजीनाटयावरून दिसून येते. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतीपदी शिवसेनेने अंबादास दानवे यांची निवड केली, तसे पत्रच त्यांनी विधानपरिषदेच्या अध्यक्षांना दिले आहे. मात्र त्यानंतर काँगे्रस नाराज झाली आहे. काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडीवर तीव्र आक्षेप घेत, विधान परिषदेचे अध्यक्षपदावर काँगे्रसचा अधिकार असतांना, शिवसेनेने हा दावा केला. शिवाय काँगे्रसला विचारात न घेता परस्पर शिवसेनेने निर्णय घेतल्यामुळे काँगे्रसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यात महाविकास आघाडी निर्माण करण्यात राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा आणि शिवसेनेचा पुढाकार असला, तरी यात काँगे्रसला बळजबरीने आणून बसवले होते. शिवाय काँगे्रसचा शिवसेनेसोबत जाण्यास विरोध होता. मात्र शरद पवार काँगे्रस नेत्या सोनिया गांधी यांचे मन वळविण्यात यशस्वी ठरल्यामुळे ही आघाडी जन्माला आली होती. मात्र पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच या आघाडीचे सरकार कोसळले. सरकार कोसळल्यानंतर आता आघाडीतील नेते सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे. एकतर आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊ नये, अशी काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रसची भूमिका होती. मात्र त्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेनेने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता निवडतांना आघाडीतील नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी सर्वांना ग्रहित धरून हा निर्णय घेतल्यामुळे आघाडीत फुटीचे स्पष्ट संकेत निर्माण झाले आहे. महागाई, जीएसटी आणि तपास यंत्रणाविरोधात काँगे्रसने देशभर आंदोलन केल्यानंतर शिवसेनेने सामनातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसवर ताशेरे ओढले होते. कारण शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे शिवसेना काहीशी नाराज असल्याचा सूर यावेळी निघाला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत आघाडीमध्ये नाराजीचे बीज रोवले गेले होते. त्यानंतर त्याचा आता स्फोट होतांना दिसून येत आहे. आगामी काही महिन्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निवडणूका देखील आघाडी संयुक्तपणे लढवण्यावर ठाम नाही. त्यामुळे तिन्ही पक्ष या निवडणुका वेग-वेगळया लढतील, यात शंका नाही. शिवाय तिन्ही पक्ष एकत्र लढून देखील सर्वात जास्त जागा नेहमीच भाजपने जिंकल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी निवडणूका वेग-वेगळया लढल्या तर यात भाजपचाच विजय होणार आहे. मुंबई महापालिका कायम आपल्या हातात राहावी यासाठी शिवसेनेने नेहमीच आकंडतांडव केले आहे. कोणत्याही थराला जायची, कुणासोबतही हातमिळवणी करण्याची तयारी शिवसेनेने नेहमीच ठेवली आहे. जर मुंबई महापालिकेमध्ये सत्तांतर झाले, तर इतक्या वर्षांत या महापालिकेत झालेला भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो. अनेक नेते पुन्हा तुरुंगाची वाट धरू शकतात. त्यामुळे इतरत्र सत्ता गेली, किंवा पराभूत झालो तरी चालेल, मात्र मुंबई महापालिका हातात हवी, ही शिवसेनेची इच्छा या वेळी मोडीत निघण्याची शक्यता आहे. शिवाय महाविकास आघाडीतील फूट पुन्हा एकदा शिवसेनेला घेऊन डुबणार, यात शंकाच नाही.

COMMENTS