Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येवला नाका भागातील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण

कोपरगाव - नगर-मनमाड महामार्गावर येवला नाका भागात नगर परिषदेने रस्त्याच्या कडेला खोदकाम केले असून, त्या ठिकाणी खड्ड्यात पडून दुर्घटना घडण्याची शक्

निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देणार
शेतकरी आणि वीज वितरण अधिकारी यांच्यामध्ये अड.प्रताप ढाकणे यांनी घडवून आणली चर्चा
राज्यात शनिवार, रविवारी लॉकडाऊन

कोपरगाव – नगर-मनमाड महामार्गावर येवला नाका भागात नगर परिषदेने रस्त्याच्या कडेला खोदकाम केले असून, त्या ठिकाणी खड्ड्यात पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. येवला नाका भागात नगर परिषदेने खोदलेला हा खड्डा बुजवला नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम रखडले आहे. याकडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून, निष्क्रिय मुख्याधिकारी या ठिकाणी एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे.
नगर परिषद प्रशासनाच्या बेपर्वाई व ढिसाळ कारभारामुळे काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरात सर्व्हे नं. 105 मधील हनुमाननगर भागात सचिन गहिनीनाथ गजर (वय 36 वर्षे) या गरीब युवकाचा भूमिगत गटारीच्या उघड्या पाईपमध्ये पडून मृत्यू झाला होता. या भागातील नागरिकांनी सदर पाईपलाईनच्या कामाबाबत अनेकदा मागणी करूनही नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सदर दुर्घटना घडून सचिन गजरला हकनाक आपला जीव गमवावा लागला होता. आता तशाच घटनेची पुनरावृत्ती होण्याची नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी व प्रशासन वाट पाहत आहे काय? असा सवाल नागरिक विचारत आहेत. नगर-मनमाड महामार्गावर येवला नाका परिसरात नगर परिषद बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला खोदकाम केले आहे. त्यामुळे रस्त्याच्या लगत साईड पट्टीवर मोठा खड्डा पडला असून, तेथून ये-जा करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
नगर-मनमाड महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. येवला नाका भागात शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, दुकाने, पेट्रोल पंप, निवासी वसाहती असल्याने नागरिकांची या मार्गावरून कायम वर्दळ असते. याच महामार्गावर येवला नाका भागात एसएसजीएम महाविद्यालयाकडे जाणार्‍या रस्त्याजवळ साई जनरल स्टोअरसमोर कोपरगाव नगर परिषदेने रस्त्याच्या कडेला खोदकाम केले आहे. हा रस्ता नेमका कशासाठी खोदला हे समजायला मार्ग नाही. साईड पट्टीवर खोदलेला खड्डा बुजवलेला नाही. नगर परिषद बांधकाम विभागाने ‘काम चालू आहे’ असा फलक त्या ठिकाणी लावला आहे. हे काम लवकर पूर्ण न करता तसेच रखडवत ठेवले आहे. नगर-मनमाड महामार्गावर तसेच येवला नाका परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून, नगर परिषद प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे या ठिकाणी अपघात व मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही नगर परिषद प्रशासन मात्र अजूनही झोपेतच आहे. आधीच नगर परिषद मुख्याधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे शहरवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाणी, रस्ते, गटारी, वीज आदी मूलभूत सोयी-सुविधांची पूर्तता करत नसल्याने नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष आहे. तसेच तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचेही याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे. नगर परिषद मुख्याधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे व लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वी हनुमाननगर भागात दुर्घटना घडून त्यात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला होता. आता येवला नाका भागात त्याची पुनरावृत्ती होण्याची नगर परिषद मुख्याधिकारी प्रतीक्षा करीत आहेत? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून, या रस्त्यावरून अनेक नागरिक कोपरगाव शहरात खरेदीसाठी व इतर कामासाठी येतात. येवला नाका भागात नगर परिषदेने खोदलेला खड्डा तात्काळ बुजवावा नाही तर या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास नगर परिषद मुख्याधिकारी त्यास जबाबदार राहतील, असे नागरिकांत बोलले जात आहे.

COMMENTS