Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फुगलेला बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जागेवर आला, जिल्हाधिकार्‍यांच्या प्रयत्नाला यश, कॉपीमुक्त मोहिमेमुळे निकालाची घसरण

नांदेड : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर मार्च-एप्रिल 2026 मधील बारावी परी

खा. अशोकराव चव्हाण व आ.श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा परिषदेत घेतली आढावा बैठक
नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत; शंकर कंगारे यांचा माणुसकीचा आदर्श
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान प्रतिमेचे उपस्थीतांना वाटप; पार्डी(म) ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
Amarnath - नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त  जीएसटी नांदेड : सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहुल ...

नांदेड : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर मार्च-एप्रिल 2026 मधील बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नांदेड जिल्ह्याचा एकूण निकाल 78.50 टक्के लागला आहे. विशेष बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 15 टक्क्यांची घट नोंदवली गेली असून, हा बदल शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरत आहे.
यंदा जिल्ह्यातील 48 हजार 652 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 48 हजार 500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 38 हजार 72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखानिहाय निकाल पाहता विज्ञान शाखा 88.82 टक्क्यांसह आघाडीवर राहिली, तर वाणिज्य (70.64%), व्होकेशनल (66.74%) आणि कला शाखा (60.11%) यांचे निकाल तुलनेने कमी राहिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आपले वर्चस्व कायम राखले आहे. तालुकानिहाय निकालात अर्धापूर (94%) अव्वल ठरला असून, मुदखेड, नांदेड, लोहा आणि देगलूर या तालुक्यांनीही समाधानकारक कामगिरी केली. मात्र कंधार (63.16%), किनवट, माहूर आणि बिलोली या तालुक्यांचे निकाल चिंताजनक पातळीवर राहिले. निकालातील घसरणीमागे कॉपीमुक्त मोहिमेचा थेट परिणाम असल्याचे प्राथमिक विश्लेषणातून स्पष्ट होत आहे. यापूर्वी कॉपीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या अनेक परीक्षा केंद्रांवर यंदा कडक नियंत्रण ठेवण्यात आले, ज्यामुळे कृत्रिमरीत्या वाढलेले निकाल थांबले. यामुळेच वास्तववादी चित्र समोर आल्याचे मानले जात आहे. याचबरोबर, नांदेडमध्ये वाढलेल्या कोचिंग संस्कृतीचाही निकालावर परिणाम दिसून येतो. विशेषतः विज्ञान शाखेतील विद्यार्थी नीट आणि जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी शहरातील कोचिंग क्लासेसमध्ये वर्षभर व्यस्त असतात. अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्रामीण महाविद्यालयांत असले तरी ते नियमित उपस्थित राहत नाहीत आणि थेट परीक्षेलाच हजर होतात. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण आणि बोर्ड परीक्षेतील सुसंगती कमी होत असल्याचे चित्र आहे. नांदेड शहरातील नामांकित विज्ञान महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थिती विना ओस पडत असल्याची तक्रार संस्थाचालकांकडून होत आहे, तर दुसरीकडे 25 ते 30 हजार विद्यार्थी केवळ कोचिंगवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर येत आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील शैक्षणिक पायाभूत सुविधा, शिक्षकांची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यासंबंधीही प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक ठिकाणी विषय तज्ञ शिक्षकांची कमतरता, प्रयोगशाळांची अपुरी साधनसामग्री आणि डिजिटल शिक्षणाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना पक्क्या होत नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. परिणामी, बोर्ड परीक्षेत अपेक्षित निकाल साध्य होत नाही. तज्ज्ञांच्या मते, केवळ निकाल वाढविण्यावर भर न देता विद्यार्थ्यांच्या मूलभूत आकलनावर आणि कौशल्यविकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालये यांच्यातील समन्वय वाढवणे, उपस्थिती सक्तीने अंमलात आणणे आणि नियमित अंतर्गत मूल्यमापन प्रभावी करणे ही काळाची गरज ठरत आहे. एकूणच, निकालातील घसरण ही केवळ आकड्यांची बाब नसून शिक्षणाच्या दर्जाबाबतचा गंभीर इशारा आहे. कॉपीमुक्त मोहिमेने वास्तव उघड केले असले, तरी आता शिक्षण व्यवस्थेने गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती आणि बोर्ड-केंद्रित तयारी यावर नव्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

COMMENTS