केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून स्थानिक लोकप्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून स्थानिक लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचार्यांच्या सहकार्याने योजनांचा लाभ मिळवावा, असे आवाहन तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथे विकसित भारत अभियानांतर्गत आयोजित गावफेरी व जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, कृऊबासचे संचालक व जिल्हाध्यक्ष निळकंठराव मदने, कृषी विभागाचे सूर्यभान, प्रतिभा गोणारकर, सरपंच शोभाबाई कांबळे, मारोतराव देशमुख, पंजाबराव देशमुख आणि गंगाधरराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विकसित भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच नांदेड येथे बदली झालेल्या तलाठी लक्ष्मण देशमुख यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला, तर नवनियुक्त तलाठी रवी अंभोरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार देवणीकर यांनी मतदार पुनर्सर्वेक्षण मोहिमेबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करत, प्रत्येक मतदाराने दोन छायाचित्रांसह आवश्यक अर्ज भरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी मंजूर घरांचे बांधकाम वेळेत पूर्ण करावे, जेणेकरून प्रतीक्षायादीतील इतर पात्र लाभार्थ्यांनाही घरकुलाचा लाभ देता येईल, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष निळकंठराव मदने यांनी पात्र लाभार्थ्यांना घरकुल, रेशन, विहीर व इतर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी शिवकुमार देशमुख, पोलीस पाटील किरण भांगे, शंकर हापगुंडे, डॉ. पल्लवी फिसके, भाऊराव मदने, शेख गुलाब, मारोतराव हापगुंडे, रामल्लू बेतीवार, बिबीषण कांबळे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS