सिव्हिल’मधील आगीच्या घटनेचा तपास झाला ठप्प

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हिल’मधील आगीच्या घटनेचा तपास झाला ठप्प

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास तीन महिन्यांपूर्वी म्हणजे 6 नोव्हेंबर 2021 रोजी लागलेल्या आगीच्या घटनेसंदर्भामध्ये विद

घराला लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तू जळून खाक
आमदार निलेश लंकेच्या आंदोलनास पाथर्डीत संमिश्र प्रतिसाद
चोरी-घरफोडी करणारे सराईत चोरटे पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास तीन महिन्यांपूर्वी म्हणजे 6 नोव्हेंबर 2021 रोजी लागलेल्या आगीच्या घटनेसंदर्भामध्ये विद्युत विभागाचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास थांबलेला आहे, अशी स्पष्टोक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, विद्युत विभागाचा तांत्रिक अहवाल ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट करणारा असल्याने त्याची प्रतीक्षा पोलिसांना आहे व हा अहवाल आल्याशिवाय पोलिसांना या प्रकरणी दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्रही न्यायालयात पाठवता येणार नाही.
मागील वर्षी दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी 6 नोव्हेंबर 2021 रोजी सिव्हील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात आग लागून 15जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला व आग लागलेल्या अतिदक्षता विभागातून रुग्णांना वाचवण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल एका महिला वैद्यकीय अधिकार्‍यांसह तीन परिचारिका अशा चार महिलांना अटक केली होती. तर दुसरीकडे शासनाने नाशिक विभागीय आयुक्तांची चौकशी समिती नेमली होती व या समितीने त्यांचा अहवाल शासनाला दिला आहे. यातील काही तांत्रिक बाबींचे स्पष्टीकरण बाकी असल्याने हा अहवाल शासनाने अद्याप जाहीर केलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी पोलिस अधीक्षक पाटील यांना पोलिसांकडे दाखल असलेल्या यासंदर्भातील गुन्ह्याच्या तपासाबाबत विचारणा केली असता त्यांनी राज्य विद्युत निरीक्षकांच्या यासंदर्भातील अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. त्यांना पत्र व स्मरणपत्रही पाठवले असल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

पोलिसांकडे भक्कम पुरावे
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले की, नगर जिल्हा रुग्णालयाच्या आगीच्या प्रकरणासंदर्भामध्ये सुरुवातीला जे काही पुरावे पोलिसांच्या हाती होते, त्याआधारे कारवाई केली आहे. पोलिसांना त्यावेळेला व्हिडिओ शूटिंग व सीसीटीव्ही फुटेज मिळालेले होते. त्याआधारे कारवाई झाली, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. पण त्यापुढे जाऊन नंतर अन्य काही भक्कम पुरावे सुद्धा पोलिसांच्या हाती यासंदर्भात लागलेले आहेत. ते एकत्र करून आम्ही सुरुवातीची कारवाई केली असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या दृष्टिकोनातून जे काही जवाब घ्यायचे होते किंवा तपास करायचा होता, तो पोलिसांनी केलेला आहे. या संदर्भामध्ये पोलिसांचा तपास पूर्ण झालेला आहे. पण दुसरीकडे या आगीच्या संदर्भामध्ये अनेक टेक्निकल बाबी आहेत. त्यासंदर्भात अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही. विद्युत विभागाचा अहवाल मिळण्याबाबत संबंधित विभागाला दोन वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, स्मरणपत्रेही दिली आहेत. मात्र त्यांच्याकडून अद्यापपर्यंत आम्हाला अहवाल प्राप्त झालेला नाही. तो अहवाल प्राप्त झाल्यावर आमच्याकडील पुरावे व या अहवालानुसार स्पष्ट होणारे पुरावे संकलित करून दोन्ही पुराव्यांच्या अनुषंगाने निश्‍चितपणे पुढे जाऊन कारवाई करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या वेळेला तो अहवाल प्राप्त होईल, त्या वेळेला आमच्याकडे असलेले मागचे पुरावे अशी दोन्ही माहिती आम्ही एकत्र करून गुन्ह्याचा पुढील तपास करून तो तपास पूर्णत्वाकडे जाईल, असेही पाटील यांनी सांगितले व त्यानंतरच न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल होईल असेही ते म्हणाले.

COMMENTS