युद्धविराम आणि संभाव्य परिणाम!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युद्धविराम आणि संभाव्य परिणाम!

           इराण आणि अमेरिका व इस्त्रायल यांच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये जाहीर झालेला पंधरा दिवसांचा युद्धविराम हा के

संविधान महासभा आणि राहुल गांधी!
सत्ताधारी जातवर्गाला सत्तेचे अपचन!
ओबीसी आरक्षण आणि ऍड. प्रकाश आंबेडकर !
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1-1-1-1.png

           इराण आणि अमेरिका व इस्त्रायल यांच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये जाहीर झालेला पंधरा दिवसांचा युद्धविराम हा केवळ तात्पुरता दिलासा नसून जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मध्यपूर्वेतील अस्थिरता ही नेहमीच जगासाठी चिंतेचा विषय राहिली आहे, कारण या प्रदेशाचा थेट संबंध ऊर्जा पुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सामरिक संतुलनाशी आहे.

पश्चिम आशियातील तणाव कमी होताच जागतिक बाजारात मोठा परिणाम दिसून आला असून, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर ऊर्जा बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे.

या कराराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग तात्पुरता खुला करण्यास सहमती दर्शवली आहे. या मार्गातून जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू (एल‌एनजी) वाहतूक होते. त्यामुळे हा मार्ग पुन्हा सुरू झाल्याने जागतिक पुरवठा साखळीला मोठा आधार मिळाला आहे. या घडामोडीनंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. 

या युद्धविरामामुळे सर्वप्रथम जागतिक पातळीवर तणाव कमी झाल्याची भावना निर्माण झाली आहे. युद्ध सुरू असताना कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतात. मात्र युद्धविराम जाहीर होताच किंमती घसरल्या, यावरून बाजारपेठेची संवेदनशीलता स्पष्ट होते. यामुळे सामान्य नागरिकांपासून उद्योगांपर्यंत सर्वांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

युध्द विरामाच्या या १५ दिवसांत थेट किंवा मध्यस्थांमार्फत चर्चेची प्रक्रिया वेग घेऊ शकते. दीर्घकालीन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र, युद्धविरामाचा वापर सैन्याची पुनर्बांधणी, रणनीती बदल आणि संरक्षण मजबूत करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे नव्याने क्षेपणास्त्रे निर्मिती सुध्दा वाढवली जाऊ शकते. शिवाय अनेकदा युद्धविरामाच्या काळात गुप्त माहिती गोळा करणे, सायबर हल्ल्यांची तयारी किंवा अप्रत्यक्ष कारवाया वाढू शकतात.

शक्तिशाली देश आणि संघटना शांतता टिकवण्यासाठी दबाव आणू शकतात. वर्तमान युध्द हे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सर्वात भीषण युद्ध ठरले आहे. या युध्दाचे आर्थिक आणि व्यावसायिक दुष्परिणाम जगातील सर्वच देशांना भोगावे लागले आहेत. यात चीन आणि रशिया अपवाद नसला तरी या दोन्ही देशांना या युध्दाचा एक वेगळा लाभ दिसतो आहे. हे युद्ध थांबल्याने अमेरिका आणि नाटो देशांना युक्रेन ला मदत करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे रशिया विरुद्ध युक्रेन चे आक्रमक स्वरूप वाढू शकते. या कारणामुळे हे युद्ध चालावे ही रशियाची आंतरिक इच्छा आहे. चीन देखील या इच्छेला अपवाद नाही. इराण च्या माध्यमातून खरेतर चीन करित असलेले प्राॅक्सी वाॅर आहे. चीन ला यातून स्वतःला महासत्ता म्हणून सिद्ध करायचे आहे. युद्धविराम असला तरी काही गंभीर धोके कायम आहेत. युद्ध पुन्हा सुरू झाल्यास तेलपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकतो. जागतिक आर्थिक बाजार, व्यापार आणि चलन यावर परिणाम होऊ शकतो.

या युद्धविरामात पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावल्याचे श्रेय दिले जात आहे. यामुळे पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय महत्त्व काही प्रमाणात वाढू शकते. मात्र यामागे राजकीय आणि सामरिक हितसंबंधही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे युद्ध पुन्हा भडकल्यास जग विनाशाकडे वाटचाल करेल यात शंका असण्याचे कारण नाही. हा अत्यंत गंभीर आणि चिंतनाचा विषय आहे. सध्याच्या परिस्थितीत काही गोष्टी स्पष्ट दिसतात.  दुसरीकडे शांततेसाठी प्रयत्न, आंतरराष्ट्रीय संस्था आणि संवादाची प्रक्रिया अजूनही जिवंत आहे. त्यामुळे जग पूर्णपणे विनाशाकडे जात आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल, पण धोका नक्कीच वाढलेला आहे.

हा पंधरा दिवसांचा युद्धविराम हा  संघर्ष थांबवण्याची, संवाद वाढवण्याची आणि दीर्घकालीन शांततेचा मार्ग शोधण्याची एक संधी आहे. मात्र ही संधी योग्य प्रकारे वापरली नाही, तर पुन्हा संघर्ष भडकू शकतो. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय हे केवळ संबंधित देशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या भविष्यावर परिणाम करणारे ठरणार आहेत.

COMMENTS