पुणे : पुण्यात बुधवारी सासवड ते कोंढवा दरम्यान काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी मधेच रोखल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आ

पुणे : पुण्यात बुधवारी सासवड ते कोंढवा दरम्यान काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी मधेच रोखल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. नियोजनानुसार बाईक रॅली खडी मशीन चौकापर्यंत पोहोचून तेथे सभा घेण्याचा कार्यक्रम होता. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रॅलीला आधीच अडवले.
भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पहाटेपासूनच पोलिसांनी विविध ठिकाणी अडथळे उभारून रस्ते बंद केले होते. तरीही मोठ्या संख्येने नागरिक आणि तरुण सहभागी झाल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. मोर्चेकर्यांनी पुढे जाण्याचा आग्रह धरला असताना, पोलिसांनी मात्र परवानगी नाकारत त्यांना थांबवले. या आंदोलनातून कोंढवा परिसरातील संशयितांवर तातडीने गुन्हे नोंदवून अटक करावी, तसेच भिवरीतील ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या कथित अन्यायाचाही मुद्दा पुढे करण्यात आला. दरम्यान, खडी मशीन चौक परिसरात इतर समाजातील नागरिकही जमा होऊ लागल्याने संभाव्य संघर्षाची शक्यता वाढली. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोर्चाला पुढे जाण्यापासून रोखले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोर्चा रोखण्यात आल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगात संबंधित नेते आपली भूमिका कायम ठेवून पुढील निर्णयाबाबत ठाम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

COMMENTS