संगमनेर : तालुक्यातील डोंगरांना वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटनांमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून या प्रकारांना जबाबदार असणाऱ्या

संगमनेर : तालुक्यातील डोंगरांना वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटनांमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून या प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिला आहे.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तांबे यांनी म्हटले आहे की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून गेल्या २० वर्षांपासून दंडकारण्य अभियान राबविले जात असून जयहिंद लोकचळवळ, सहकारी संस्था आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येत आहे. मात्र अलीकडील काळात डोंगरांवर आगी लावण्याचे प्रकार वाढले असून वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.संगमनेर तालुक्यात सुमारे २५० डोंगर व २०० दऱ्या असून हा भाग डोंगराळ आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड परिसरातही या अभियानाचा विस्तार करण्यात आला आहे. मात्र खांडगाव येथील कपारेश्वर डोंगरावर यापूर्वी अनेकदा झाडांना आग लावण्याच्या घटना घडल्या असून एका घटनेत ४०० ते ५०० झाडे जळून खाक झाली होती. तक्रारी करूनही दोषींवर कारवाई होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.मागील महिन्यात सायखिंडी परिसरातील डोंगरावर मोठ्या प्रमाणात आग लागून सुमारे दीड किलोमीटर परिसर जळून गेला. उंच डोंगर असल्याने आग विझविण्यास उशीर झाला व दंडकारण्य अभियानांतर्गत लावलेली झाडे होरपळली. त्यानंतर मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गडावरही आग लागली. गावातील तरुणांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली, मात्र सुमारे २५ टक्के झाडांचे नुकसान झाले.दरम्यान, नुकतीच सप्तशृंगी गडावर लावलेल्या सुमारे ६४ हजार झाडांनाही आग लागली असून त्यातील सुमारे २५ टक्के झाडे जळाली आहेत. या ठिकाणी चराईबंदी, कुऱ्हाडबंदी करून संरक्षक तारेचे कुंपण घालून मोठ्या कष्टाने वृक्षलागवड करण्यात आली होती. आगीबाबत वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाला माहिती देऊनही दोषींवर कारवाई होत नसल्याची खंत तांबे यांनी व्यक्त केली.सतत लागणाऱ्या आगींमुळे पर्यावरण धोक्यात आले असून ही केवळ झाडांची हानी नसून पर्यावरणाचा ‘खून’ असल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनांबाबत वन विभाग नेमकी कोणती भूमिका घेत आहे, असा सवाल उपस्थित करत तातडीने कठोर कारवाई न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दोषींना संरक्षण का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत यापुढे अशा घटना घडल्यास शांत बसणार नसल्याचा इशाराही दुर्गाताई तांबे यांनी दिला आहे.

COMMENTS