मुंबई : आगामी आयपीएल स्पर्धेची रंगत चढू लागली असतानाच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर तिकीट विक्रीतील

मुंबई : आगामी आयपीएल स्पर्धेची रंगत चढू लागली असतानाच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर तिकीट विक्रीतील गैरप्रकार उघडकीस येत असून मुंबईत टी-20 विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे. या प्रकरणात एका माजी क्रिकेटपटूसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा भारत आणि श्रीलंका येथे झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला होता. या सामन्याच्या तिकिटांची मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईत 26 वर्षीय बलवंत सिंह सोधा याला अटक करण्यात आली असून तो पूर्वी मुंबई अंडर-19 संघाकडून खेळलेला आहे. पोलिसांच्या तपासात उघड झाले की, या संपूर्ण जाळ्यात सोधा याची मध्यवर्ती भूमिका होती. तोच तिकिटांची व्यवस्था करून ती आपल्या साथीदारांकडे जास्त दराने विक्रीसाठी देत होता. तपासात पुढे असेही समोर आले की, उपांत्य सामन्याच्या तिकिटांची मूळ किंमत तुलनेने कमी असताना ती 25 हजार ते 35 हजार रुपयांपर्यंत विकली जात होती. या व्यवहारातून मोठा आर्थिक गैरफायदा घेतला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये एका महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकाचा तसेच शिक्षकेतर कर्मचार्याचाही समावेश आहे. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती अधिक मोठी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासानुसार, मुंबई क्रिकेट संघटनेशी संबंधित व्यक्तींना किंवा पाहुण्यांसाठी राखीव असलेले पास आरोपींकडून मिळवले जात होते. त्यानंतर ही तिकिटे थेट ग्राहकांना किंवा विविध माध्यमांतून अधिक दराने विकली जात होती.

COMMENTS