बीड : दि.19 एप्रिल रोजी सोलापूर-धुळे महामार्गावर गेवराई शहराजवळ मध्यरात्री सुमारे 1:30 वाजता ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या धडकेत कारमधील

बीड : दि.19 एप्रिल रोजी सोलापूर-धुळे महामार्गावर गेवराई शहराजवळ मध्यरात्री सुमारे 1:30 वाजता ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या धडकेत कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले. रात्रीची वेळ असल्याने मदतीसाठी कोणतेही वाहन थांबत नव्हते.
याचदरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे येत असताना त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना गेवराई येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या या तत्पर आणि संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अपघातात गणेश बाबूराव शेवाळे, त्यांची पत्नी शीतल शेवाळे आणि मुलगी प्रियदर्शिनी हे गंभीर जखमी झाले असून मुलगा साई किरकोळ जखमी झाला आहे. हे कुटुंब छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे कारने(एमएच-12 एसक्यू 2989) प्रवास करत होते. दरम्यान, बीडकडून जळगावकडे जाणारा ट्रक (एमएच-20 ईजी 7666) विरुद्ध दिशेने येऊन कारला जोरदार धडकला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्यासह इतर पोलीस कर्मचारीही दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलीस अधीक्षक पुढील प्रवासासाठी बीडकडे रवाना झाले. त्यांच्या तत्परतेमुळे जखमींचे प्राण वाचले असून त्यांच्या या कृतीतून मानवतेचे दर्शन घडले आहे.

COMMENTS