माजलगाव : माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भारतीय संविधान आणि आजचे वर्तमान या विषय

माजलगाव : माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भारतीय संविधान आणि आजचे वर्तमान या विषयावर विचारप्रवर्तक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम सुंदरराव सोळंके महाविद्यालयात सायंकाळी 6 वाजता माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक विचारवंत श्रीरंजन आवटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना, संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून देशाचा स्पष्ट मार्गदर्शक नकाशा असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांची सखोल मांडणी करत त्यांनी समाजाने संविधानाच्या जपणुकीसाठी सजग राहण्याची गरज व्यक्त केली. प्रास्ताविकात नीला देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक योगदानावरही प्रकाश टाकला. आपल्या भाषणात श्री. आवटे यांनी आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य करत बेरोजगारी, हमीभावाचा अभाव, सुरक्षेची कमतरता आणि वाढती जातीय तेढ ही महत्त्वाची आव्हाने असल्याचे नमूद केले. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे, लोकशाहीतील चारही स्तंभ मजबूत करणे आणि सामूहिक नेतृत्वाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी उपस्थितांशी संवाद साधून विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. आ. प्रकाशदादा सोळंके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बाबासाहेबांच्या विचारांमुळेच देशात शांतता आणि स्थैर्य टिकून आहे. महिलांना 50 टक्के राजकीय सहभाग देण्याची संकल्पना त्यांच्या तत्त्वज्ञानातूनच पुढे आली आहे. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सहाल चाऊस, प्रा. अन्वर शेख, सभापती जयदत्त नरवडे, नगरसेवक राहुल लंगडे, रोहन घाडगे, इम्रान भैया, जुबेर खान, निलाताई, प्राचार्य डॉ. पॉलराज सर, इरफान पठाण सर, सुहास सोळंके यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मडके यांनी केले तर आभार प्रदर्शन सखाराम जोशी यांनी मानले. संविधान, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभावी संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

COMMENTS