शिमला : हिमाचल प्रदेशातील लाहोल-स्पीती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेत प्रवासी वाहनावर डोंगरावरील मोठी दरड कोसळून 13 जणांचा मृ
शिमला : हिमाचल प्रदेशातील लाहोल-स्पीती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेत प्रवासी वाहनावर डोंगरावरील मोठी दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला. तिंदी येथून पांगीकडे निघालेल्या प्रवासी वाहनावर अचानक दगड-मातीचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने हे वाहन पूर्णपणे चिरडले गेले. प्रशासनाने प्राथमिक माहितीनुसार 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उदयपूर-किलाड मार्गावरील कडू नाला परिसरात हा अपघात घडला. कुल्लूहून पांगीकडे निघालेल्या प्रवासी वाहनात चालकासह सुमारे 14 जण प्रवास करत होते. वाहन कडू नाला परिसरात पोहोचताच डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळला. त्यामुळे प्रचंड दगड आणि माती वाहनावर आदळून ते पूर्णपणे दबले गेले. या मार्गावर मागील दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मार्ग बंद असल्याने अनेक प्रवासी तिंदी येथे थांबले होते. शुक्रवारी रस्ता सुरू झाल्यानंतर हे वाहन पांगीच्या दिशेने रवाना झाले; मात्र काही अंतरावरच भीषण दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सीमा रस्ते संघटनेच्या कर्मचार्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. पांगी उपविभागाचे अधिकारी अमनदीप सिंग यांनीही घटनास्थळी पोहोचून बचाव मोहिमेवर देखरेख सुरू केली. सततचा पाऊस, खराब हवामान आणि डोंगरावरून सुरू असलेली दगड-मातीची घसरण यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू आहे. मृतांची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्रमाण मानण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS