रमाई घरकुल योजनेंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणार्य
रमाई घरकुल योजनेंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणार्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे.
महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसर्या हप्त्यापासून वंचित आहेत. नगर परिषद प्रशासनाने फक्त स्वतःची वाहवा मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या. घरकुलाचे स्वप्न पाहणार्या परळीतील गरीब आणि मागासवर्गीय बांधवांची ही थट्टा आहे. जर निधी खरोखरच मंजूर झाला असेल, तर तो लाभार्थ्यांच्या खात्यावर का दिसत नाही? प्रशासनाने तात्काळ हा निधी प्रत्यक्ष जमा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असेही महादेव गंगणे पाटील यांनी स्पष्ट केले. परळी नगर परिषदेच्या या भोंगळ कारभारामुळे शहरांमधील घरकुल लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने यावर तत्काळ स्पष्टीकरण देऊन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा न केल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही महादेव गंगणे पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS