शेवगाव, दि. १० : मुकुंदनगर परिसरात काम करत असताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या हिंदू युवक धीरज परदेश

शेवगाव, दि. १० : मुकुंदनगर परिसरात काम करत असताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या हिंदू युवक धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी शेवगाव बंदची हाक देण्यात आली. या बंदला व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शेवगाव शहरातील बाजारपेठ व व्यावसायिक व्यवहार शंभर टक्के बंद राहिल्याचा दावा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला.
धीरज परदेशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, हत्येमागील सूत्रधार तसेच मास्टरमाइंडचा शोध घ्यावा आणि दोषींवर पुराव्यांच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आला होता.
सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध भागांतील दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या शेवगाव शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शांतता पाहायला मिळाली. नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळत प्रशासनाला सहकार्य केले.
दरम्यान, सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेऊन निष्पक्ष, सखोल व पारदर्शक तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळवून द्यावी, हत्येमागील सूत्रधार व मास्टरमाइंडचा शोध घ्यावा, तसेच आरोपींना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच संबंधित आरोपींच्या घरांची व जमिनीची कायदेशीर प्रक्रियेनुसार झडती घेऊन आवश्यक ती कारवाई करावी आणि संपूर्ण प्रकरणाची कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
धीरज परदेशी यांना न्याय मिळावा आणि दोषींवर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, ही सकल हिंदू समाजाची प्रमुख मागणी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांचा बंदोबस्त
बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून शेवगाव शहरात आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनी शांततेत बंद पाळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, हत्या प्रकरणातील पुढील तपास व पोलिस प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS