पारनेर : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती मिळावी, त्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी

पारनेर : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती मिळावी, त्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी होता यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले विशेष मार्गदर्शन व माहिती शिबीर बुधवारी उत्साहात पार पडले. खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून आधार दिव्यांग ट्रस्ट व निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात या शिबिराचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोहिदास ढेरंगे यांनी प्रस्तावना करून शिबिराच्या उद्देशाची माहिती दिली. यावेळी दीपक लंके यांनी दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबईचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नॅशनल ट्रस्टच्या पालकत्व योजनेविषयी माहिती दिली. याशिवाय दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या २१ विविध योजनांचा तपशील उपस्थितांसमोर मांडत मार्गदर्शन केले.
नॅशनल ट्रस्ट, पुणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या दिव्यांग प्रदेश कार्याध्यक्ष भाग्यश्री गिरीश मोरे यांनी निरामय आरोग्य पॉलिसी, दिव्यांग महिला धोरण आणि विविध कल्याणकारी योजनांविषयी माहिती दिली. दिव्यांग महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधी आणि सुविधांवर त्यांनी विशेष प्रकाश टाकला.
दत्तात्रय आंबेकर यांनी पारनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध अडीअडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच स्थानिक स्तरावर आवश्यक असलेल्या सुविधांबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमास नीलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील करंजुले, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सुनिता वाळेकर, ॲड. उज्वला घोडके, संतोष जाधव, राजू भुजबळ, गौतम आढाव, सुमन बाबर, सुखदेव तांबे, बाबुराव अहिरे, दत्तात्रय आंबेकर यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

COMMENTS