बीड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण जपणारा आणि स्वराज्याच्या वैभवाचा जागर करणा

बीड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण जपणारा आणि स्वराज्याच्या वैभवाचा जागर करणारा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा यंदा 5 व 6 जून 2026 रोजी रायगड किल्ला येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्याबाबत माहिती देताना समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे पाटील यांनी राज्यभरातील शिवभक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर संपन्न झाला. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा हा सुवर्णक्षण मानला जातो. याच ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या सोहळ्यात ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहिरांचा… स्वराज्याच्या इतिहासाचा’ आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
5 जूनला सोहळ्याची भव्य सुरुवात
5 जून रोजी पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी स्थळ येथे अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या स्वागतानंतर शिवभक्तांसह रायगड चढाई केली जाईल. गडपूजन, पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिके, ढोल-ताशा, लेझीम, टाळ-मृदंगाचा गजर, शिवशाहिरांचा जागर, गडदेवता शिरकाई देवीचा गंधिक तसेच वारकरी संप्रदायाचे कीर्तन-भजन यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
6 जूनला राज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा
6 जून रोजी सकाळी ध्वजपूजन व ध्वजारोहणाने कार्यक्रमास प्रारंभ होईल. शाहिरी कार्यक्रमानंतर श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन होईल. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते उत्सवमूर्तीचा अभिषेक तसेच सिंहासनावरील मूर्तीस सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात येणार आहे. यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या संकल्पनेतून भव्य पालखी सोहळा काढण्यात येईल. पालखी जगदीश्वर मंदिर येथे पोहोचल्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. अखेर श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता होईल.
शिवभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आणि शिवरायांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने दुर्गराज रायगडावर उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ उत्सव नसून स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा, शौर्याचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा जागर आहे, असे मत गंगाधर काळकुटे पाटील यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला शिवचरित्रकार ज्ञानदेव काशिद, ऋषिकेश बेदरे, सरदार लक्ष्मण नरनाळे आदी उपस्थित होते.

COMMENTS