नांदेड :शिवसेना (शिंदे गट) पक्ष संघटनेला नव्याने धार देण्याच्या उद्देशाने नांदेड येथे पार पडलेली लोकसभा आढावा बैठक केवळ औपचारिक ठरली नाही, तर ती

नांदेड :
शिवसेना (शिंदे गट) पक्ष संघटनेला नव्याने धार देण्याच्या उद्देशाने नांदेड येथे पार पडलेली लोकसभा आढावा बैठक केवळ औपचारिक ठरली नाही, तर ती पक्षातील वास्तवाचा आरसा ठरली. संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संघटनात्मक शिस्त, गटबाजी, आणि निवडणुकीतील अपयश यावर थेट भाष्य करण्यात आले.
नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघांचा एकत्रित आढावा घेणारी ही बैठक तब्बल चार ते पाच तास रंगली. राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांच्यासह अनेक आमदार, माजी मंत्री आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निधीचा पाऊस, पण मतपेटीत दुष्काळ बैठकीतील सर्वात ठळक मुद्दा ठरला तो म्हणजे विकास निधी आणि निवडणूक निकालातील विसंगती. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकाळात आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचे मान्य करण्यात आले. मात्र, या निधीचा अपेक्षित राजकीय फायदा होत नसल्याची खंत व्यक्त झाली. कोट्यवधींचा निधी देऊनही नगरसेवक निवडून येत नसतील, तर त्याचा उपयोग काय? असा थेट सवाल उपस्थित करत स्थानिक नेतृत्वाला आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्यात आला. नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील अपेक्षाभंग हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. ‘अति-लोकशाही’वर प्रहार, शिस्तीचा कडक संदेश बैठकीत पक्षातील वाढती गटबाजी आणि शिस्तभंग यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षात अति-लोकशाही वाढली आहे, असे स्पष्ट करत प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनेच्या चौकटीत राहून काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. इथे व्यक्तिगत गट नाहीत, फक्त शिवसेना आहे, हा स्पष्ट संदेश देत कार्यकर्त्यांना भगवा ध्वज केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. पहिले शिस्तीत वागायला शिका, हा कडक इशारा देखील यावेळी देण्यात आला. कार्यकर्त्यांचा आवाज ऐकणारे नेतृत्व या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांना दिलेली मुक्त अभिव्यक्तीची संधी. अनेकांनी स्थानिक आमदारांविषयी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी संघटनात्मक अडचणी स्पष्टपणे मांडल्या. या पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कटू असले तरी सत्य ऐकले पाहिजे, असे सांगत नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. तक्रारींची दखल घेत सुधारणा करण्याचे निर्देशही आमदारांना देण्यात आले. परभणीत गटबाजी, हिंगोलीत समाधान जिल्हानिहाय आढाव्यात वेगवेगळे चित्र समोर आले. हिंगोली जिल्ह्यातील संघटन मजबूत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, परभणी जिल्ह्यातील पदाधिकार्यांमधील विसंवाद आणि गटबाजी उघडपणे समोर आली. सेलू येथील पदाधिकार्यांना ऐकून घेतोय म्हणून धमकी देऊ नका, असा थेट इशारा देण्यात आला. काहींनी जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणीही केली, ज्यामुळे परभणीतील अंतर्गत संघर्ष स्पष्ट झाला. नांदेडमध्ये पराभवाची कबुली नांदेड दक्षिणमधील महानगरपालिका निवडणुकीत 20 उमेदवार उभे करूनही केवळ एकच नगरसेवक निवडून आल्याची कबुली स्थानिक आमदारांनी दिली. हा पराभव संघटनात्मक त्रुटींचा परिणाम असल्याचे मान्य करत भविष्यात सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले. इलेक्शनमध्ये गर्मी दाखवा आणि निकाल द्या, असा थेट संदेश देत निष्क्रियतेवर प्रहार करण्यात आला. निवडणुका नसतानाही संघटनावर फोकस विशेष म्हणजे सध्या कोणतीही मोठी निवडणूक नसतानाही राज्यभर अशा आढावा बैठका घेतल्या जात आहेत. यामागे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. चर्चा थांबवून आता कृतीकडे वळा, हा बैठकीचा निष्कर्ष ठरला. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.‘ऑपरेशन टायगर’वर संभ्रम कायम दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटात येणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले की, ऑपरेशन टायगर नावाच्या कोणत्याही योजनेबाबत त्यांना माहिती नाही. माध्यमांनीच अशा बातम्या चालवल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मपरीक्षणातून नव्या टप्प्याकडे
नांदेडमधील ही बैठक केवळ आढावा नव्हती, तर पक्षासाठी एक चेतावणी ठरली. निधी, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद असूनही अपेक्षित यश मिळत नसल्याने आता अंतर्मुख होण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले. शिस्त, समन्वय आणि कृती यांच्या आधारावरच आगामी काळात शिवसेना संघटना नव्याने उभारी घेईल, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.

COMMENTS