कर्जत : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभय पाटील यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा न दिल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब

कर्जत : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभय पाटील यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा न दिल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी बाजार समितीमध्ये जोरदार आंदोलन करत उपसभापतींच्या दालनात घुसून तोडफोड केली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी उपसभापती अशी असलेली पाटी काढून फेकत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच दालनाला कुलूप ठोकून तीव्र इशारा दिला.
आज सकाळी मोठ्या संख्येने शिवसैनिक बाजार समिती कार्यालयात दाखल झाले. त्यांनी उपसभापती अभय पाटील यांच्या दालनात प्रवेश करून तेथील पाट्यांची तोडफोड केली. यावेळी “शब्द पाळा”, “राजीनामा द्या” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी उपसभापती पदाची पाटी काढून टाकत दालनाला टाळे ठोकले. तसेच हे कुलूप कोणी उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला “शिवसेना स्टाईलने धडा शिकवू,” असा इशाराही संतप्त शिवसैनिकांनी दिला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना तालुकाप्रमुख बळीराम यादव म्हणाले की, “कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदासाठी अभय पाटील यांना दोन वर्षांची संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी स्वखुशीने राजीनामा देण्याचे मान्य केले होते. त्या वेळी संचालक मंगेश जगताप हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. मात्र मुदत संपूनही अभय पाटील पदाला चिकटून बसले आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या दालनाला कुलूप ठोकले असून यापुढे त्यांना उपसभापती म्हणून कोणतेही काम करू देणार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला नाही तर त्याचा परिणाम बाजार समितीच्या कामकाजावर होईल,” असा इशारा त्यांनी दिला.
या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मासिक बैठक होती. यावेळी सभापतीसह अनेक संचालक उपस्थित होते; मात्र शिवसैनिकांनी इतर कोणत्याही पदाधिकारी किंवा संचालक यांना या प्रकरणाबाबत कोणताही उल्लेख केला नाही व मासिक सभेची कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवा असे सांगतानाच आमचा विषय फक्त उपसभापती यांच्या राजीनामा पुरताच मर्यादित असल्याचे सांगितले.
“उपसभापतींच्या दोन वर्षांच्या मुदतीबाबत मला कोणतीही माहिती नाही. माझ्यासमोर असा कोणताही विषय ठरलेला नव्हता. त्यामुळे त्याबाबत मी काही सांगू शकत नाही. मात्र उपसभापतीपदाच्या राजीनाम्याबाबत आमचे नेते व मार्गदर्शक विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे निर्णय घेतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सर्व निर्णय होईल.
– काकासाहेब तापकीर, सभापती बाजार समिती.

COMMENTS