फिरोजाबाद : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात लखनऊ-नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेसवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या रेल्वेत

फिरोजाबाद : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात लखनऊ-नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेसवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या रेल्वेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असल्याने सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. सुदैवाने या घटनेत मोहन भागवत तसेच इतर कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या डब्याच्या खिडकीची बाहेरील काच फुटल्याने रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत हे कानपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर लखनऊहून नवी दिल्लीकडे शताब्दी एक्सप्रेसने रवाना झाले होते. ते कार्यकारी श्रेणीतील ‘ई-१’ (E-1) डब्यातील आरक्षित आसनांवर प्रवास करत होते. रेल्वे मख्खनपूर आणि फिरोजाबाद स्थानकांदरम्यान धावत असताना काही अज्ञात समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केली. यातील एक दगड मोहन भागवत प्रवास करत असलेल्या डब्याच्या खिडकीवर आदळला. दगडाचा जोरदार फटका बसल्याने खिडकीची बाहेरील काच फुटली. मात्र, सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या दुहेरी काच व्यवस्थेमुळे दगड डब्याच्या आत शिरू शकला नाही आणि मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. सुरक्षा कारणास्तव रेल्वेचा प्रवास मध्येच थांबविण्यात आला नाही, तर रेल्वेला नियोजित मार्गाने पुढे रवाना करण्यात आले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास सुरू केला आहे. रेल्वेमार्गालगतच्या वस्त्या आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा केली जात आहे.

COMMENTS