Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा बँकेकडून कर्जे स्वस्त केल्याची घोषणा

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व नोकरदारांना डोळ्यासमोर ठेऊन बँकेच्या थेट 47 कर्ज योजना

भूजल समृध्द ग्रामस्पर्धेत जिल्ह्यात किरकसाल प्रथम
सातार्‍यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची आता राज्यभरात अंमलबजावणी : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांना यश
आगामी निवडणुकांमध्ये एकी कायम दाखवा : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे आवाहन

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व नोकरदारांना डोळ्यासमोर ठेऊन बँकेच्या थेट 47 कर्ज योजना व सोसायट्यांमार्फत राबविल्या जाणार्‍या 68 कर्ज योजनांच्या व्याजदरात एक ते तीन टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. राज्यातील 31 सहकारी बँकांमध्ये सगळ्यात कमी कर्ज व्याजदर देणारी बँक ठरली असून, राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबरीला आली आहे. हा निर्णय एक मेपासून वितरित होणार्‍या नवीन कर्जांना लागू आहे. या निर्णयामुळे बँकेवर 17 ते 18 कोटींचा बोजा पडणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रदीप विधाते, दत्तानाना ढमाळ, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, सुरेश सावंत, लहुराज जाधव, रामभाऊ लेंभे उपस्थित होते.
सातारा जिल्हा बँक तब्बल सात लाखांवर कर्जदार सभासदांबरोबर वाटचाल करत आहे. आर्थिक विकासाचे चक्र अधिक गतिमान करण्याचा मानस बँकेने डोळ्यासमोर ठेऊन व्याज कपातीचा निर्णय घेतला आहे, असे सांगून पाटील व डॉ. सरकाळे म्हणाले, जिल्हा बँकेच्या थेट 47 योजना व सोसायट्यांमार्फत 68 योजनांतून कर्जपुरवठा केला जातो. बँकेचा मुख्य ग्राहक हा शेतकरी आहे. त्यांना सुलभ व्याजदरात कर्ज पुरवठा उपलब्ध करून देऊन विविध शेती व शेतीपूरक व्यवसायाची उभारणीसाठी संचालक मंडळाने 1 मे पासूनच्या कर्ज वाटपावरील व्याजदरात एक ते तीन टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला. फळबाग, फुलशेती लागवड, उपसा जलसिंचन, ठिबक, तुषार सिंचनसारख्या शेती उत्पादन वाढ करून देणार्‍या उत्पादक कर्ज योजनांसाठी सभासदांना साडेदहा टक्के तर शेतकरी निवास, सर्वसामान्य कर्ज योजनेसारख्या अनुत्पादक कर्जासाठी 11 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे.
यामध्ये क्षारपड जमीन सुधारणा, शैक्षणिक कर्ज, संकरित गाय, मुरा म्हैस, पंढरपुरी म्हैस, मांसासाठी देशी कुकुटपालन, इलेक्ट्रिक मोटार व पाइप लाईन, शेळीपालन, पोल्ट्री, शेत जमीन खरेदी, कृषी पर्यटन, जमीन सुधारणा, रेशीम उद्योग यांना बँक पातळीवर साडेआठ टक्के, तर संस्था पातळीवर साडेदहा टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. सामान्य कर्ज, दुचाकी वाहन कर्ज, सौर ऊर्जा सयंत्र खरेदी, ग्रामीण शौचालय, शेतकरी निवास दुरुस्ती, फ्लॅट, गाळा, प्लॉट खरेदी, आटा चक्की, चारचाकी वाहन कर्ज बँक पातळीवर नऊ टक्के, तर संस्था पातळीवर 11 टक्के व्याजदर असेल. साखर कारखान्यांना दिलेल्या कॅश क्रेडिट कर्जाची मार्च अखेर 30 कोटींची येणे बाकी असून, यापूर्वी या कर्जाचा व्याजदर 11.50 टक्के होता. त्यामध्ये दीड टक्का कपात करून तो दहा टक्के केला आहे. मध्यम व दीर्घ मुदत कर्जासाठी दहा टक्के, बँकेच्या कर्जदार मार्केटिंग संस्था, ग्राहक संघ, प्रक्रिया संस्था व पाणी पुरवठा संस्था यांना भांडवलाकरिता कॅश क्रेडिट कर्जपुरवठा केला जातो. त्यासाठी कर्ज व्याजदरात दोन टक्के कपात करून तो दहा टक्के केला आहे. विकास सोसायट्यांना दहा टक्के दराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. कर्जाच्या व्याजदरात कपात केली असली, तरी बँकेकडे असलेल्या ठेवींच्या व्याजदरात कोणतीही कपात केलेली नसल्याचे डॉ. सरकाळे यांनी सांगितले.

COMMENTS