Homeताज्या बातम्या

गटविकास अधिकाऱ्यांवरील आरोपांना सरपंचांचा विरोध; समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंमलबजावणीबाबत व्यक्त केला विश्वास

शेवगाव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची शेवगाव तालुक्यात यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच व

उत्तर प्रदेशात नवा राजकीय भूकंप? समाजवादी पक्षाचे खासदार फुटणार; मंत्री ओमप्रकाश राजभर यांचा खळबळजनक दावा
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील : आमदार विवेक कोल्हे; रयतच्या एसएसजीएम महाविद्यालयात भव्य सत्कार संपन्न
‘राहुरी कृषी विद्यापीठ’ आणि ‘आत्मा’चा नाशिक जिल्ह्यात संयुक्त उपक्रम

शेवगाव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची शेवगाव तालुक्यात यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना निवेदन सादर करून गटविकास अधिकारी सोनल शहा आणि केज (जि. बीड) येथील गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्यावरील आरोपांना विरोध दर्शवत त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने यंदापासून सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात शेवगाव तालुक्यातील सुमारे २० ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला. गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतींनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. अभियानाच्या कालावधीत शहा यांनी विविध ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची पद्धत आणि गुणवत्तापूर्ण कामकाजाबाबत सातत्याने मार्गदर्शन केले. तालुकास्तरीय पाहणी समितीने सहभागी ग्रामपंचायतींची सखोल पाहणी करून पारदर्शक पद्धतीने मूल्यांकन केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तथापि, निकाल जाहीर झाल्यानंतर काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थातून शेवगाव व केज येथील गटविकास अधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने पुरस्कार मिळवून देण्यासाठी सरपंचांकडे आर्थिक मागणी केली नसून, गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या ग्रामपंचायतींनाच पुरस्कार मिळावा, हीच त्यांची भूमिका असल्याचे निवेदनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी प्रशासनाने ठामपणे उभे राहावे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या बिनबुडाच्या आरोपांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ढोरजळगावचे सरपंच डॉ. सुधाकर लांडे, जोहरापूरचे सरपंच रोहन दिलीपराव लांडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब ढोके, दहीगावचे सरपंच रामेश्वर भापकर, वरखेडचे सरपंच परमेश्वर तेलोरे यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

COMMENTS