कोपरगाव : "शिक्षण क्षेत्रात वाढत्या बदलांच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या मूल्यांवर आधारित रयत शिक्षण संस्था समाजातील

कोपरगाव : “शिक्षण क्षेत्रात वाढत्या बदलांच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या मूल्यांवर आधारित रयत शिक्षण संस्था समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे कार्य करत आहे. एस.एस.जी.एम. महाविद्यालयाशी माझे जुने आणि आगळेवेगळे ऋणानुबंध आहेत. जनसेवेचे सामाजिक कार्य करणाऱ्या विद्यार्थ्याचा आमदार झाल्यानंतर याच महाविद्यालयात होणारा हा सन्मान माझ्यासाठी विशेष आणि अभिमानास्पद आहे. आगामी काळात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स (एसएसजीएम) कॉलेज येथे विधानपरिषद सदस्य झाल्याबद्दल आमदार कोल्हे यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाविद्यालयाच्या ‘कल्पतरू’ नियतकालिकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप वर्पे, सुरेश बोळीज, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, अश्वमेधचे प्रमुख ज्ञानेश्वर वाकचौरे, शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्यासह सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आमदार कोल्हे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेतील माझ्या प्रवासाची सुरुवात याच महाविद्यालयातून झाली आहे. स्व. शंकरराव कोल्हे आणि स्व. शंकरराव काळे यांनी संस्थेच्या विकासाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. यावेळी बोलताना ॲड. संदीप वर्पे यांनी, कोपरगावला एक हक्काचा आमदार लाभला असून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आमदार विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाची मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

COMMENTS