बिलोली : सगरोळी येथील रेती साठ्याच्या जाहीर लिलाव प्रक्रियेत सर्वोच्च बोली लावूनही ठरलेली रक्कम न भरता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित लिलाव

बिलोली : सगरोळी येथील रेती साठ्याच्या जाहीर लिलाव प्रक्रियेत सर्वोच्च बोली लावूनही ठरलेली रक्कम न भरता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित लिलावधारकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील शिंपाळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, नांदेड यांना निवेदन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सगरोळी येथील खाजगी रेती घाट भाग क्रमांक 1 मधील रेती साठा महसूल प्रशासनाच्या ताब्यात घेऊन दि. 24 मार्च 2026 रोजी उपविभागीय कार्यालय, बिलोली येथे जाहीर लिलाव करण्यात आला. या लिलावात सुमारे 4, 167 ब्रास रेती साठ्याचा समावेश होता. उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. लिलावात 20 ते 25 इच्छुकांनी सहभाग घेतला होता. नियमानुसार, सर्वोच्च बोली लावणार्या लिलावधारकाने त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत 25 टक्के रक्कम जमा करणे बंधनकारक होते. उर्वरित रक्कम दोन दिवसांत भरल्यानंतरच रेती वाहतुकीस परवानगी देण्यात येणार होती. दरम्यान, प्रति ब्रास 9 हजार रुपये दराने सुमारे 3 कोटी 75 लाख रुपयांची सर्वोच्च बोली पोशटी दरमारम (रा. निर्मल, तेलंगणा) यांनी लावली. मात्र, त्यांनी निर्धारित वेळेत कोणतीही रक्कम न भरता प्रशासन व इतर लिलावधारकांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून, संबंधित लिलावधारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंपाळकर यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

COMMENTS