नांदेड: जिल्ह्यातील अवैध रेती माफियांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी जोरदार दणका देत मोठी कारवाई केली आहे. गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रे

नांदेड: जिल्ह्यातील अवैध रेती माफियांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी जोरदार दणका देत मोठी कारवाई केली आहे. गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर धाड टाकत पोलिसांनी तब्बल ७२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, जिल्ह्यात कायद्याचा धाक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
बोट, इंजिन आणि हायवा ट्रक जप्त
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारा एमएच-२८-आर- ७८०० क्रमांकाचा हायवा ट्रक, तसेच गोदावरी नदीपात्रातून रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी बोट, इंजिन आणि तराफे जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शासनाच्या महसुलाची होणारी मोठी हानी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी समाधान बाबासाहेब जाधव (रा. गोवर्धनघाट), आदिनाथ मोरे, तुकाराम मोरे (दोघे रा. भनगी) तसेच दोन अनोळखी आरोपी अशा एकूण पाच जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८३/२०२६ व ७८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७) व ४८(८) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण, व्यंकट कुसमे तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
बेकायदेशीर धंद्यांविरोधात विशेष मोहीम तीव्र करणार
या कारवाईनंतर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन, अवैध दारू, जुगार, गुटखा आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. कायद्याला आव्हान देणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. गुन्हेगार कितीही प्रभावशाली असला तरी कायद्यापुढे तो तितकाच सामान्य आहे, हा संदेश नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या धडक कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

COMMENTS