श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी पेरलेल्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी पेरलेल्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी कुकडी पाटबंधारे विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता यांना अधिकृत निवेदन देऊन शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्याची तसेच तालुक्यातील तलाव व साठवण बंधारे भरून देण्याची आक्रमक मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्रीगोंदा तालुक्यात यंदा पाऊस अत्यंत कमी झाल्याने पिके करपू लागली असून ती पूर्णपणे धोक्यात आली आहेत. दुसरीकडे, कुकडी प्रकल्प क्षेत्रात यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला असून काही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून ओव्हरफ्लो होणारे पाणी वाया जाऊ न देता नदीपात्रात सोडण्याबरोबरच साठवण बंधारे भरून ते शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडून पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, अशी विनंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत स्थानिक आमदार विक्रम पाचपुते यांनाही माहिती व पुढील कारवाईसाठी देण्यात आली आहे. तालुक्यातील बळीराजाच्या हिताचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS