आष्टी : आष्टी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित
आष्टी : आष्टी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. 2018 मध्ये नवीन बसस्थानक इमारतीचे काम मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आले होते. मात्र तब्बल आठ वर्षे उलटूनही हे काम अपूर्ण अवस्थेतच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बसस्थानक परिसरात सध्या अस्वच्छता, दुर्गंधी आणि देखभालीचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. काही ठिकाणी कचर्याचे ढीग साचले असून, परिसरात जनावरांचा वावर असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, तसेच स्वच्छतागृहांची दुरवस्था यामुळे विशेषतः महिला प्रवाशांची गैरसोय अधिक वाढली आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बसस्थानक परिसरात उघड्यावर नैसर्गिक विधी करण्यास भाग पडणारी परिस्थिती निर्माण झाली असून, ही बाब आरोग्यदृष्ट्याही गंभीर ठरू शकते. धूळ आणि अस्वच्छतेमुळे श्वसनाचे त्रास होण्याचा धोका वाढत असल्याचेही नागरिक सांगतात. 2018 मध्ये सुरू झालेले हे काम पुढील काही वर्षांत विविध टप्प्यांवर रखडले. दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळातही प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 2024 नंतर कामात काही प्रमाणात हालचाल दिसत असली तरी आठ वर्षांचा विलंब हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांकडून आमदार आणि प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून निधी उपलब्ध करणे, ठेकेदार व संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे अशी मागणी केली जात आहे. तसेच बसस्थानक परिसरात सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप असलेल्या अवैध व्यवसायांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. बसस्थानकाची ही अवस्था म्हणजे आमच्या रोजच्या प्रवासातील वेदना आहेत. प्रशासनाने आता तरी गंभीर दखल घ्यावी. आष्टी बसस्थानकाचा हा दीर्घकाळ रखडलेला प्रश्न कधी सुटणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS