अकोले : रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या सीएसआर प्रकल्पांतर्गत अकोले तालुक्यातील नागरिकांसाठी ‘शीत शव पेटी’

अकोले : रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या सीएसआर प्रकल्पांतर्गत अकोले तालुक्यातील नागरिकांसाठी ‘शीत शव पेटी’ मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत संबंधित शीत शव पेटी ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली.
या उपक्रमाची संकल्पना माजी प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांच्या पुढाकारातून साकारली असून ओम साई राम स्टील, जालना यांच्या सीएसआर निधीतून ही सुविधा उपलब्ध झाली आहे. अकोले येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहेत्रे व डॉ. मारुती भांडकोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शीत शव पेटीचे लोकार्पण करून ती ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष तथा विद्यमान डिस्ट्रिक्ट डायरेक्टर विद्याचंद्र सातपुते यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, सन २०२४-२५ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेश साबू यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार झाला असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अनेकदा नातेवाईक दूरवरून येईपर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अंत्यविधी लवकर उरकावा लागत होता. ही गरज लक्षात घेऊन रोटरी क्लबने हा उपक्रम राबवून नागरिकांसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहेत्रे यांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले. ही शीत शव पेटी तालुक्यातील सर्व नागरिकांना गरजेनुसार उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.डॉ. मारुती भांडकोळी यांनीही या उपक्रमामुळे तालुक्यातील एक महत्त्वाची गैरसोय दूर झाल्याचे सांगत नागरिकांकडून याचे स्वागत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी डॉ. सौ. ज्योती भांडकोळी, रोटरी क्लबचे अध्यक्ष अमोल देशमुख, सहायक प्रांतपाल अमोल वैद्य, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर विद्याचंद्र सातपुते, डॉ. रवींद्र डावरे, सचिन देशमुख, सचिन आवारी, विजय पावसे, डॉ. जयसिंग कानवडे, डॉ. राहुल वाळे, डॉ. सुशील बेणके, ज्ञानेश्वर आरोटे आदी उपस्थित होते.

COMMENTS