श्रीगोंदा: तालुक्यातील घारगाव व बेलवंडी परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवार

श्रीगोंदा: तालुक्यातील घारगाव व बेलवंडी परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि. २९ जुलै २०२६) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घारगावजवळील जंगलातून आलेल्या बिबट्याने नगर-दौंड राजमार्ग ओलांडून थेट गावाच्या दिशेने धाव घेतल्याची थरारक घटना घडली.
यावेळी पत्रकार मुश्ताक पठाण हे दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यांच्या शेजारून (MH 45 AF 7062) क्रमांकाचा आयशर टेम्पो जात होता. अचानक बिबट्या समोर आल्याचे लक्षात येताच टेम्पो चालकाने प्रसंगावधान राखत वाहनाचा वेग वाढविला. त्यामुळे बिबट्याने हल्ला न करता रस्त्यावरील दुभाजक ओलांडून गावाच्या दिशेने पळ काढला. घटनेनंतर टेम्पो चालक बारवकर (रा. इंदापूर) यांनी वाहन थांबवून मुश्ताक पठाण यांची विचारपूस केली.
गुरुवारी सकाळी पत्रकार मुश्ताक पठाण यांनी वन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांच्या निर्देशानुसार वनपाल रवींद्र तुपे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.
दरम्यान, पळून गेलेल्या बिबट्याने बेलवंडी शिवारातील काळाने वस्तीवर एका कुत्र्याचा फडशा पाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. यापूर्वीही घारगावजवळील पिंपळगाव पिसा परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. घारगाव-बेलवंडी परिसरात जंगल असल्याने भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा वावर वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS