नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सुरू असलेल्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचे आरोप पुढे आले आहेत. अंत

नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सुरू असलेल्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचे आरोप पुढे आले आहेत. अंतिम मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या व्यक्तीचे नाव नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट करून त्याचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्याचा प्रयत्न होत असल्याची लेखी तक्रार फार्मासिस्ट प्रसाद वाघमोडे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केली आहे.
बी.फॉर्म, एलएल.एम. शिक्षण घेतलेल्या प्रसाद वाघमोडे यांनी दिलेल्या हरकत अर्जात निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अंतिम प्रकाशित मतदार यादीत संबंधित व्यक्तीचे नाव नसताना निवडणूक प्रक्रियेदरम्यान अचानक नाव समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाघमोडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यासाठी वैध प्रशासकीय प्रक्रिया, सदस्य मंजुरी आणि अधिकृत दुरुस्ती आवश्यक असते. मात्र संबंधित प्रकरणात सदस्यत्व मंजुरी आदेश, फी भरल्याची नोंद, कार्यकारिणीचा ठराव किंवा सदस्य नोंदवही यांची कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. निवडणूक निर्णय अधिकार्यांना स्वतःच्या अधिकारात नवीन सदस्य समाविष्ट करण्याचा किंवा अपात्र व्यक्तीस पात्र घोषित करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान विशिष्ट उमेदवाराला लाभ मिळवून देण्यासाठीच संबंधित नाव समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय अशा प्रकारची कृती ही समान संधी, निष्पक्ष निवडणूक आणि नैसर्गिक न्याय तत्वांचे उल्लंघन करणारी असल्याचे वाघमोडे यांनी म्हटले आहे. जर निवडक लोकांची नावे नियमबाह्यरीत्या समाविष्ट केली जात असतील तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचे नाव कोणत्या आदेशाने आणि कोणत्या तारखेस समाविष्ट करण्यात आले याची लेखी माहिती द्यावी, सदस्यत्व मंजुरीची सर्व कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावीत तसेच नियमबाह्यरीत्या स्वीकारलेला उमेदवारी अर्ज तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित न झाल्यास हे प्रकरण सक्षम प्राधिकरण, सहकारी विभाग तसेच न्यायालयीन स्तरावर नेण्यात येईल, असा इशाराही प्रसाद वाघमोडे यांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रियेतील या आरोपांमुळे नांदेड जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी हे बीड येथील असून ते उंटावरून शेळ्या राखत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी इतर सहा निवडणूक अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे जे नांदेड येथील असून केमिस्ट संघटनेचे सदस्य आहेत. त्यांचे अनेक नातेवाईक, जवळचे कुटुंबीय निवडणूक लढविणार आहेत. त्यांना गोपनीय माहिती पुरवली जात असल्याची तक्रार प्रसाद वाघमोडे यांनी केली आहे. ज्या सदस्यांची निवडणूक अर्ज बाद होण्याची शक्यता होती त्यांना निवडणुका अधिकार्यांनी बोलावून त्यांचे अर्ज दुरुस्त करून घेतले आहेत. जे उमेदवार निवडणुकीत उभा राहिले आहेत … ज्यांच्यापासून धोका आहे अशा उमेदवारांची अर्ज बाद केले जात आहे. त्यांच्या सूचक, अनुमोदकावर दबाव आणला जात आहे. मागील दोन निवडणुका या केवळ औपचारिक निवडणूक दाखवून दोन्ही गटातील मातब्बर उमेदवारांना निवडून आणल्याचे दाखविले गेले होते. याही वेळी नावालाच दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असून दोन्ही मधील क्लबिंग केली जात आहे. मागील दहा वर्षांमध्ये निवडून आलेल्या पदधिकार्यांची एकही वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नाही. एकट्या नांदेड शहरामध्ये साडेचार हजार नोंदणीकृत फार्मासिस्ट असून केवळ 1 हजार 800 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधील सुमारे चार हजार चारशेऔषधी दुकाने बंद असल्याची तक्रार वाघमोडे यांनी केली आहे. या यादीमधील अनेक दुकाने बंद असूनही त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. अनेक दुकानांच्या पत्त्यावर तपासून पाहिल्यास ही औषधी दुकाने अस्तित्वातच नसल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे. जे फॉर्म अस्तित्वात आहेत त्यांची नावे मात्र वगळण्यात आली आहेत. ज्यांनी जुने फर्म बंद करून नवीन फर्म चालू केले आहेत त्यांची सुद्धा नावे या यादीमध्ये जुने पत्ते ठेवून कायम करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे. पूर्वी निवडणुकीची जाहिरात वर्तमानपत्रातून प्रसिद्ध व्हायची यावेळी मात्र खूपच छोटी जाहिरात वर्तमानपत्र प्रसिद्ध झाल्यामुळे फार कमी सदस्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती झालेली आहे. ही निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक व्हावी अशी मागणी प्रसाद वाघमोडे यांनी केली आहे.

COMMENTS