दिवसा दिव्यांचा लखलखाट; कर्जबाजारी महापालिकेचा ‘उधळपट्टी’चा अजब नमुना!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवसा दिव्यांचा लखलखाट; कर्जबाजारी महापालिकेचा ‘उधळपट्टी’चा अजब नमुना!

नांदेड : आर्थिकदृष्ट्या कर्जाच्या खाईत अडकलेल्या नांदेड महानगरपालिकेचा भोंगळ आणि बेफिकीर कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील गोकुळ नगर ते वि

 रस्ता सुरक्षा अभियानात मिरजगावच्या विद्यार्थिनींचे यश
उजनी पाणी पुरवठा योजनेला नगराध्यक्षांची प्राथमिकता; जामखेडला वर्षभरात पाणी ; अधिकारी-पदाधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी
वाजेगाव बंधार्‍यावर दुचाकीचा भीषण स्फोट; 90 टक्के भाजलेल्या युवकाचा जागीच मृत्यू, घातपाताचा संशय
The current image has no alternative text. The file name is: 9-4.jpg

नांदेड : आर्थिकदृष्ट्या कर्जाच्या खाईत अडकलेल्या नांदेड महानगरपालिकेचा भोंगळ आणि बेफिकीर कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील गोकुळ नगर ते विसावा गार्डन परिसरात दिवसाढवळ्या रस्त्यावरील दिवे सुरू ठेवून अक्षरशः वीजेची उधळपट्टी करण्यात येत आहे. महापालिकेच्या तिजोरीवर आधीच हजारो कोटींचा बोजा असताना, अशा प्रकारे वीज वाया घालवणे म्हणजे जनतेच्या पैशांचा उघडपणे अपव्ययच असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
शहरातील अनेक भागात मूलभूत सुविधा अपुर्‍या आहेत. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याचे प्रश्न, स्वच्छतेचा अभाव अशा गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष होत असताना, दुसरीकडे मात्र दिवसा दिवे लावून ‘उजेड’ पाडण्याचा प्रकार सुरू आहे. या विरोधाभासी कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिकच तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार एखाद्या दिवशीच नव्हे तर सातत्याने घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यावरून महापालिकेच्या यंत्रणेतील निष्काळजीपणा आणि जबाबदारीचा पूर्ण अभाव स्पष्ट दिसून येतो. संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना याची कल्पना नसणे अशक्य आहे; मात्र तरीही कोणतीही कारवाई किंवा सुधारणा होत नसल्याने ‘कोणाच्या आशीर्वादाने हा कारभार सुरू आहे?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. वीज बचतीचे धडे सामान्य नागरिकांना दिले जात असताना, स्वतःचाच कारभार मात्र उधळपट्टीचा नमुना ठरत आहे. महापालिकेच्या या दुटप्पी धोरणामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘दिवसा दिवे लावणे’ हा केवळ तांत्रिक दोष आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष, याची चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान, शहरातील जागरूक नागरिकांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा अशा प्रकारच्या उधळपट्टीला आळा बसणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या महापालिकेची परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे कर वसुलीसाठी नागरिकांवर दबाव टाकणारी महापालिका, दुसरीकडे स्वतःच जनतेच्या पैशांचा असा उघडपणे अपव्यय करत असेल, तर या ‘विक्रमी’ कारभाराला लगाम घालणार तरी कोण, असा संतप्त सवाल नांदेडकरांकडून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS