पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू - संजय धुरंधरे यांचा प्रशासनाला इशारा बीड : बीड शहरातील महत्त्वाचा दळणवळण मार्

पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू – संजय धुरंधरे यांचा प्रशासनाला इशारा
बीड : बीड शहरातील महत्त्वाचा दळणवळण मार्ग असलेल्या कॅनॉल रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, नगर नाका चौक ते संत सेवालाल महाराज चौक दरम्यान रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना रोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पावसाळ्यात हे खड्डे अधिक धोकादायक ठरून मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करून सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, अशी आग्रही मागणी डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांचे समर्थक संजय धुरंधरे यांनी केली आहे.
कॅनॉल रस्त्याच्या परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, खासगी रुग्णालये, तसेच भाजीपाला व फळ मार्केट असल्याने या मार्गावर नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे आणि त्यातच रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बीड नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. जर वेळेत खड्डे बुजवले गेले नाहीत आणि रस्त्यावरील विद्युत खांब हटवण्याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संजय धुरंधरे यांनी प्रशासनाला दिला आहे.

COMMENTS