Homeताज्या बातम्यासंपादकीय

जागावाटपांतील नाराजीनाट्य

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजून बराच दिवसांचा कालावधी उलटला तरी, महायुती असो की, महाविकास आघाडी असो दोघांमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत

भारत न्याय यात्रेला होणारा विरोध
झोपडपट्टी उजळवण्याचे गाजर !
समान नागरी कायद्याची चाचपणी

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजून बराच दिवसांचा कालावधी उलटला तरी, महायुती असो की, महाविकास आघाडी असो दोघांमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जरी 17 जागांवर उमेदवार जाहीर केले असले तरी, काँगे्रस आणि शरद पवार यांनी आपले संपूर्ण उमेदवार जाहीर केलेले नाही. तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपने काही जागांवर उमेदवार जाहीर केले असले तरी, शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोन जागा सोडता इतर जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेले नाही. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीला मोठ्या बंडाची शक्यता दिसून येत असल्यामुळेच जागा वाटप पुढे ढकलण्याचे सोपस्कार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडली असून, काही ठिकाणी ते काँगे्रसला मदतच करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे वंचितने पुन्हा एकदा काँगे्रससाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवला असला तरी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्याविरूद्ध उमेदवार वंचित उभे करणार यात शंकाच नाही. त्यामुळे याची मोठी किंमत दोन्ही पक्षांना मोजावी लागू शकते. यासंदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केलेले विधान महत्वाचे आहे. आंबेडकरी समाजाची ताकद ही चळवळीतूनच आलेली आहे. आणि वंचितला सोबत घेऊन त्यांच्यासमोर 2-3 जागांचा तुकडा टाकून ही चळवळच गिळंकृत करण्याचा काही नेत्यांचा मनसुभा होता, तो आंबेडकरांनी ओळखून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. वास्तविक पाहता आंबेडकरी चळवळ ही आत्मभान जागृत असणारी चळवळ आहे. या चळवळीला आपले न्याय हक्कांसाठी लढा अविरतपणे सुरू ठेवणे जमते. त्याचप्रमाणे आपल्या हक्कांवर गदा येत असल्यास हा समाज पेटून उठतो. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील आत्मभान नाहीसे करण्यासाठी आपण आंबेडकरांना सोबत घेऊन चळवळ मोडीत काढू असा समज असलेल्यांना यामुळे चपराक बसली आहे. खरंतर वंचितची केवळ 6 जागांची मागणी होती. मात्र केवळ तीन जागांवर बोळवण करण्याचे मनसुभे यानिमित्ताने उघडे पडल्याचे दिसून येत आहे. त्यातच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतांना ठाकरे गटाने आपल्या 17 जागांवरील लोकसभेचे उमेदवार जाहीर केल्यानंतर विशेषतः काँगे्रसने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर सर्वाधिक आमदार आणि खासदार बाहेर पडले आणि त्यांनी थेट शिवसेनेवर दावा करत तो पक्षच मिळवला. त्यामुळे उद्धव ठाकरे एकाकी पडले असे असतांना, महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा त्यांना देण्यात आल्या. शिवाय ठाकरे गट अतिशय मनमानीपणे आपल्या पदरात जागा पाडून घेतांना दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच काँगे्रसने नाराजी दर्शवली नसती तर नवलच. ठाकरे गट कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येत होते. मात्र ठाकरे गटाकडे कोल्हापूरसाठी तगडा उमेदवार नसल्यामुळे ती जागा साहजिकच काँगे्रसने आपल्याकडे घेतली. शिवाय त्याला शरद पवारांनी पाठिंबा दिला. कारण शरद पवारांनीच कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांना महाविकास आघाडीकडून लढण्याची गळ घातली. शेवटी त्यांची देखील इच्छा असल्यामुळे त्यांनी होकार दर्शवला. राजेंना शरद पवार आपल्या पक्षाकडून लढण्याची गळ घालू शकले असते, मात्र त्यांनी तसे न करता, त्यांच्या इच्छेनुसार पक्ष निवडण्याची मूभा दिल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँगे्रसला साथ दिली. मात्र त्यामुळे ठाकरे गटाने इतर जागांवर आपली उमेदवारी देऊन पुन्हा एकदा काँगे्रसवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता आजकाळचे पक्ष किंवा महाविकास आघाडीतील पक्ष निवडणुकीनंतर पुन्हा एकदा कुणाच्या वळचणीला जातील ते सांगता येत नाही.

COMMENTS