बीड: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रियदर्शनी प्राथमिक व राष्ट्रीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालयात पारंपर

बीड: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रियदर्शनी प्राथमिक व राष्ट्रीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालयात पारंपरिक बाल वारकरी दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक पी. एन. पाटील यांच्या हस्ते भगवान विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई तसेच वारकरी यांच्या आकर्षक वेशभूषेत सहभाग नोंदवला. मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीचे विशेष आकर्षण वाढविले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या उत्साहाने पायी दिंडीत सहभागी झाले. मार्गात नागरिकांनी आपल्या घरांसमोर रांगोळ्या काढून तसेच औक्षण करून दिंडीचे स्वागत केले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती, सण-उत्सव, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून देण्यात आले. दिंडीदरम्यान बाल वारकर्यांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर अभंग गात भक्तिरसात रंगून सहभाग घेतला.
दिंडी शाळेत परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी रिंगण धरून फुगड्या खेळल्या आणि विठ्ठल नामाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. या कार्यक्रमात राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन. पाटील, प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. आय. पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
बाल वारकरी दिंडीचे नियोजन ए. एन. पवार व डी. आर. बोरवडे यांनी केले, तर संचालन व्ही. पी. जाधव व ए. बी. उगले यांनी केले. पालखीचे आकर्षक सुशोभीकरण एस. एम. गायकवाड, पी. आर. वाघमारे, ए. के. वाघमारे, ए. ए. राऊत आणि एस. आर. जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी व्ही. आर. घोडके, पी. बी. पवार तसेच स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना साबुदाणा खिचडीचे वाटप केले. भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणार्या या बाल वारकरी दिंडीने सर्वांचीच मने जिंकली.

COMMENTS