समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ

Homeताज्या बातम्यासंपादकीय

समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ

कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसतांना, उत्तरप्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेला एक तरूण राजकारणात प्रवेश करतो. नुसता राजकारणात प्रवेशच करत नाही

एसटी संपाचा बागुलबुवा
भारतच खर्‍या अर्थाने विश्‍वविजेता
राजकारणातील घराणेशाही

कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसतांना, उत्तरप्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेला एक तरूण राजकारणात प्रवेश करतो. नुसता राजकारणात प्रवेशच करत नाही तर, मंत्रिपद, स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना, सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या उत्तरप्रदेश सारख्या राज्याचे मुख्यमंत्रीपद, तेही एकदा नव्हे तर तीनवेळेस, केंद्रात संरक्षणमंत्रीपद असे नानाविध पदे भुषवणारे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजेच मुलायमसिंह यादव. त्यांचे कालच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने उत्तरप्रदेशची आणि भारतीय राजकारणाची सर्वात मोठी हानी झाली आहे, जी कधीही भरून निघणारी नाही. त्यांची राजकीय कारकीर्द 55 वर्षांची राहिली. त्यांचा राजकीय आलेख सातत्याने उंचावणाराच होता. उत्तरप्रदेश विधानसभेतून 8 वेळा आमदार तर, लोकसभेवर सात वेळा खासदार म्हणून मुलायमसिंह निवडून आले होते. यावरून त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आवाका लक्षात येतो. मुलायमसिंह यांचे नाव घेतल्याशिवाय उत्तरप्रदेशचे राजकारण पूर्ण होऊच शकत नाही. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ’नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते. उत्तरप्रदेशची राजकीय समीकरणे आपल्या ताकदीवर बदलण्याची हिंमत मुलायमसिंह यांनी वेळोवेळी दाखवली. राज्यात त्यावेळी काँगे्रस आणि जनता पक्षार्च वर्चस्व होते. मात्र या पक्षांचा कधी विरोध पत्करून तर कधी सोबत घेऊन त्यांनी उत्तरप्रदेशात स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. उत्तरप्रदेश राज्यात यादव समाजाचे मोठे प्राबल्य असून, यात मुलायमसिंहांना नेहमीच अग्रस्थान होते. मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सैफई गावात मूर्ति देवी आणि सुघर सिंह यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. मुलायम सिंह हे रतन सिंह यांच्यापेक्षा लहान आहेत आणि त्यांच्या पाच भावंडांपैकी अभयराम सिंह, शिवपाल सिंह यादव, राम गोपाल सिंह यादव आणि कमला देवी यांच्यापेक्षा ते मोठे आहेत. ते ’धरतीपुत्र’ म्हणून प्रसिद्ध आहेत. मुलायम सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक आहेत. 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. गेल्या काही वर्षांत देशात जेव्हा जेव्हा तिसर्‍या आघाडीची चर्चा होते तेव्हा मुलायमसिंह यादव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. पेशाने शिक्षक असलेल्या मुलायमसिंह यादव यांच्यासाठी शिक्षण क्षेत्रानेही राजकीय दरवाजे उघडले. त्यानंतर राजकीय क्षेत्रात मुलायमसिंह यादव यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. मात्र, राजकारणात येण्यापूर्वी ते कुस्तीपटू होते. एकदा कवी संम्मेलनात तर त्यांनी एका पोलीस कर्मचार्‍याची जमिनीला पाठ लावली होती. याचबरोबर मुलायमसिंह यादव यांच्यावर अनेक वेळेस जीवघेणे हल्ले झाले, मात्र यातून ते सहीसलामत सुटले. एकदा 4 मार्च 1984 रोजी मुलायम सिंह यांनी इटावा आणि मैनपुरी येथे सभा घेतल्या. सभेनंतर ते एका मित्राला भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्या गाडीवर अचानक शूटर छोटेलाल आणि नेत्रपाल यांनी नेताजींच्या गाडीसमोर येत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी चालकाने सावधानता दाखवत गाडीची दिशा बदलली. त्यामुळे गाडी एका नाल्यात गेली. आपल्या हत्येचा प्रयत्न झाल्याचे मुलायमसिंहांच्या लक्षात आले. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रसंगावधान राखत त्यांनी कार्यकर्त्यांना आपला मृत्यू झाल्याचे सांगा असे आदेश दिले होते. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव समकालीन मित्र होते. त्यांची दोघांची राजकीय सुरुवात एकाच दशकात सुरु झाली. लालुप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये आपली राजकीय कारकीर्द यशस्वी करून दाखवली, तर मुलायमसिंह यादव यांनी उत्तरप्रदेशात. मुलायमसिंह यादव यांना आपल्या अखेरच्या टप्प्यात कुटुंबांतील राजकीय कलहाला सामौरे जावे लागले. समाजवादी पक्षाची सुत्रे अखिलेश यादव यांच्या हाती घेतल्यानंतर अखिलेश यादव यांनी पक्षाला नवे रुप देण्याचा प्रयत्न केला. यात घरातील सदस्य, याचबरोबर पक्षातील ज्येष्ठ दुखावले होते. त्यावेळेस मुलायमसिंह यादव यांनी आपल्या मुलाला जाहीरपणे सुनावण्यास कमी केले नव्हते. मुलायमसिंहांचे व्यक्तीमत्वच आगळेवेगळे होते.

COMMENTS