देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील धानोरे येथे जलजीवन मिशनअंतर्गत खोदण्यात आलेल्या तळ्यातून बाहेर पडलेल्या गौण खनिजाच्या कथित गैरव्यवहारामुळे सं

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील धानोरे येथे जलजीवन मिशनअंतर्गत खोदण्यात आलेल्या तळ्यातून बाहेर पडलेल्या गौण खनिजाच्या कथित गैरव्यवहारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शासनाच्या ताब्यातील लाखो रुपयांच्या दगड-डबर साठ्याला खासगी मालमत्ता दाखवत, अल्प रॉयल्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विक्री व वाहतूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या व्यवहारामागे महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
धानोरे येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी मोठे तळे खोदण्यात आले होते. या खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणात काळा दगड, डबर व अन्य गौण खनिज बाहेर पडले. संबंधित ठेकेदाराने हा साठा तात्पुरत्या स्वरूपात एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीत भाडेतत्त्वावर ठेवला होता. पुढे जलजीवन मिशनचे काम निधीअभावी रखडल्याने हा संपूर्ण साठा महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, त्यानंतर या साठ्याच्या विल्हेवाटीच्या नावाखाली मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आता पुढे येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाचा ताबा असलेला हा साठा खासगी मालमत्ता दाखवून राहुरी तहसील कार्यालयातून अल्प मुदतीचा परवाना मंजूर करण्यात आला. अत्यल्प रॉयल्टी भरून मंजूर प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक गौण खनिज बाहेर नेण्यात आले. या जड वाहतुकीमुळे गावातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव मंजूर करून हे गौण खनिज गावाच्या विकासकामांसाठी राखून ठेवावे, अशी मागणी केली होती. याबाबत तहसीलदारांना लेखी हरकतही देण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांच्या हरकतीकडे दुर्लक्ष करून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य पद्धतीने ही वाहतूक सुरूच राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

COMMENTS