Homeताज्या बातम्या

हरभरा बियाण्यावरील कीटकनाशक ठरले जीवघेणे; दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

धर्माबाद : धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून घरात ठ

भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड!गायकवाड कुटुंबियांना दिलासा ; मुख्यमंत्री फडणवीस यांची संवेदनशीलता
अकोल्यात बोगस सोयाबीन बियाणेप्रकरणी आणखी दोन कंपन्यांवर गुन्हे; आतापर्यंत १३ बियाणे कंपन्यांवर कारवाई
दैनिक लोकमंथनच्या बातमीचा दणकाप्रयोगशाळेने उमरीतील ‘झिंकेटेड’ खताचे दोन्ही नमुने निकृष्ट ठरवले; कृषी विभागाची क्लिनचिट फोल


धर्माबाद : धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून घरात ठेवण्यात आलेल्या कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे डेबेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोही मल्लेश डेबेकर (वय 6) आणि आराध्या मल्लेश डेबेकर (वय 4) या दोन्ही बहिणी 5 ऑगस्टच्या रात्री आई-वडिलांसोबत घरात झोपल्या होत्या. त्याच खोलीत हरभरा बियाण्याच्या पोत्यामध्ये कीड प्रतिबंधासाठी कीटकनाशक ठेवण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर या कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर झाला. आई-वडील आणि दोन्ही मुलींना अचानक उलट्या व अस्वस्थता जाणवू लागली. मात्र, प्रकृती झपाट्याने खालावल्याने 6 ऑगस्ट रोजी पहाटे आरोही आणि आराध्या या दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मल्लेश डेबेकर यांना या दोनच मुली होत्या. एका क्षणात दोन्ही लेकरांना गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 6 ऑगस्ट रोजी सकाळी बाळापूर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात दोन्ही चिमुकल्या बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागात घरामध्ये किंवा राहत्या खोलीत बियाण्यांसोबत कीटकनाशके साठवण्याच्या पद्धतीबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. कृषी विभाग आणि प्रशासनाने अशा रसायनांच्या सुरक्षित साठवणुकीबाबत जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.

COMMENTS