Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुकाराम बीज निमित्त ह.भ.प. विनोदाचार्य ओमकार महाराज घोलप यांचे भावपूर्ण कीर्तन; हृदयस्पर्शी प्रसंग ऐकून महिलांना अश्रू अनावर

वडवणी । प्रतिनिधीतुकाराम बीज निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. विनोदाचार्य ओमकार महाराज घोलप यांनी संत विचारांचे प्रभावी आणि

मतदारांनी एस.आय.आर. फॉर्म भरून लोकशाही अधिक सक्षम करावी – शेख फारुख
आईची हत्या केल्यानंतर मुलाने केली आत्महत्या | LOK News 24
 नदी प्रदूषण मुक्तीसाठी शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना सुरू- जलज शर्मा
Displaying 12.jpg

वडवणी । प्रतिनिधी
तुकाराम बीज निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. विनोदाचार्य ओमकार महाराज घोलप यांनी संत विचारांचे प्रभावी आणि मार्गदर्शक कीर्तन सादर केले. या कीर्तनातून त्यांनी संत साहित्याचा आधार घेत मानवी जीवनातील चांगल्या विचारांचे महत्त्व, चांगली संगत आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश भाविकांना दिला. कीर्तनातील हृदयस्पर्शी प्रसंग ऐकून उपस्थित भाविक भावुक झाले, तर अनेक महिलांना अश्रू अनावर झाले.
कीर्तनाच्या प्रारंभी महाराजांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा संदर्भ देत आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करू नशा आयुष्याचा या ओळींचा अर्थ स्पष्ट केला. संत तुकाराम महाराज या अभंगातून माणसाला उपदेश करतात की, आपल्या आयुष्याचा नाश होईल अशा वाईट गोष्टींपासून दूर राहावे. दुसर्‍या चरणात सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा असे सांगत ते सर्वांच्या पाया पडून माणसाला आपल्या मनाची शुद्धता राखण्याचा संदेश देतात. तिसर्‍या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की, माणसाचे खरे हित भगवंताच्या भजनात आणि नामस्मरणात आहे. मात्र ते भजन शुद्ध मनाने केले पाहिजे. मन शुद्ध असेल तरच भजनाचे खरे फळ मिळते. चौथ्या चरणामध्ये तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे असे सांगत माणसाने ज्या गोष्टीत आपले हित आहे तोच मार्ग स्वीकारावा, असा संतांचा संदेश आहे. यावेळी महाराजांनी संतांचे विचार हे केवळ अध्यात्मिक नसून प्रापंचिक जीवनालाही दिशा देणारे आहेत, असे सांगितले. संत नेहमी आपल्या वाणीचा उपयोग लोककल्याणासाठी करतात. मानवी जीवन अधिक सुखमय कसे होईल याचा संतांनी सतत विचार केला आहे. शिक्षणाबरोबरच माणसामध्ये संस्कार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याच्याकडे शिक्षणासोबत संस्कार आहेत तोच खरा सुशिक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराजांनी संगतीचे महत्त्व पटवून देताना संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी दृष्ट दुर्जनाची हा संतविचार मांडला. वाईट संगती माणसाला चुकीच्या मार्गावर नेते आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, तर चांगली संगत माणसाला योग्य मार्गावर ठेवते, असे त्यांनी सांगितले. कीर्तनादरम्यान महाराजांनी एक सत्य घटना सांगत व्यसनाचे दुष्परिणाम स्पष्ट केले. एका गावातील एका व्यक्तीकडे चाळीस एकर जमीन होती. तो मनाने उदार होता. गावातील कोणाच्या लग्नात अन्नदान करणे, कन्यादान करणे असे समाजकार्य तो करत असे. त्यामुळे गावात त्याला मोठा मान होता. मात्र काही लोकांना त्याची प्रगती सहन झाली नाही. त्यांनी त्याच्याशी मैत्री करून हळूहळू त्याला दारूच्या व्यसनात ओढले. काळाच्या ओघात तो इतका व्यसनाधीन झाला की त्याला आपल्या आयुष्याचा नाश होत असल्याचेही कळले नाही. शेवटी त्याची जमीन-जुमला, घरदार सर्व व्यसनाच्या आहारी गेले. नंतर त्याची प्रकृती गंभीर झाली. डॉक्टरांनी उपचारासाठी मोठा खर्च सांगितला; मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर काही दिवस शेजार्‍यांनी मदत केली; परंतु नंतर तेही थांबले. घरात खायला काही उरले नव्हते. लेकरांनी आईला भूक लागल्याचे सांगितले. घरातील डब्यात थोडे पीठ शिल्लक होते. आईने ते पाण्यात टाकून उकळून मुलांना दिले. हा प्रसंग सांगताना महाराजांनी सांगितले की, माणूस व्यसनाच्या आहारी गेला तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. हा हृदयस्पर्शी प्रसंग ऐकून उपस्थित भाविक भावुक झाले. अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. शेवटी महाराजांनी संतांचा संदेश देत सांगितले की, माणसाने कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करावा, चांगली संगत ठेवावी आणि भगवंताच्या नामस्मरणात राहून आपले जीवन सुखी व समाधानकारक करावे. या कीर्तन कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संतविचारांच्या या कार्यक्रमातून उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ झाला.

COMMENTS