Homeताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त 23 जून रोजी राज्यभर ‘एकल महिला दिवस’ साजरा करा-बाजीराव ढाकणे

बीड : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या **23 जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’**च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंगळवार, दि. 23 जून

पाथर्डी – गेवराई बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकात उत्साह
कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले
शिरसाटवाडीतील विकास कामांची शासकीय समितीकडून पाहणी


बीड : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या **23 जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’**च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंगळवार, दि. 23 जून 2026 रोजी राज्यभर ‘एकल महिला दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद स्तरावर व्यापक स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी साऊ एकल महिला समितीचे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे श्री. बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केली आहे.
शासन स्तरावर एकल महिलांच्या सन्मान, संरक्षण, स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी विविध सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत. तसेच राज्याचा महिला व बालविकास विभाग एकल महिला धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. या पार्श्वभूमीवर 23 जून रोजी साजरा होणारा ‘एकल महिला दिवस’ हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, एकल महिलांच्या अडचणी, समस्या आणि मागण्या जाणून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरावे, असे मत बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित, निराधार तसेच इतर एकल महिलांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांचा सत्कार करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या बाबींची लेखी नोंद घेऊन त्या एकत्रित स्वरूपात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात याव्यात, जेणेकरून त्यावर शासन स्तरावर योग्य कार्यवाही होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. एकल महिलांना सामाजिक सन्मान, आर्थिक स्वावलंबन, सुरक्षितता, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सहज उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याचेही ढाकणे यांनी नमूद केले. ‘एकल महिला दिवस’ हा एकल महिलांच्या हक्कांविषयी समाजात जनजागृती निर्माण करणारा आणि त्यांच्या सन्मानासाठी सकारात्मक वातावरण तयार करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वास व्यक्त करत बाजीराव ढाकणे यांनी बीड जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन तो यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

COMMENTS