ग्लॅस्गो: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय दिव्यांग क्रीडापथकाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाच्या पदकसंख्येत मोलाची भर घातली आहे. नाशिक ज

ग्लॅस्गो: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय दिव्यांग क्रीडापथकाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाच्या पदकसंख्येत मोलाची भर घातली आहे. नाशिक जिल्ह्यातील तोरण सांगवी येथील रहिवासी दिलीप गावित याने पुरुषांच्या १०० मीटर टी-४७ गटात सुवर्णपदक पटकावत राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. याच शर्यतीत भारताच्या मोहम्मद बासिलने रौप्यपदक जिंकत या प्रकारात भारताला दुहेरी यश मिळवून दिले.
दिलीप गावितने ही शर्यत केवळ १०.७१ सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या उत्कृष्ट कामगिरीसह त्याने स्पर्धेचा नवीन विक्रमही आपल्या नावावर केला. तर मोहम्मद बासिलने १०.८३ सेकंदाची वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. विशेष म्हणजे, दोन्ही भारतीय खेळाडूंनी याच स्पर्धेत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी मीराबाई चानूने भारोत्तोलन स्पर्धेत, तर शर्मीला धनकरने दिव्यांग गोळाफेक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. या शर्यतीत इंग्लंडच्या केव्हिन सँटोसने १०.८५ सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक पटकावले, तर ऑस्ट्रेलियाचा जॅडन पेज चौथ्या स्थानावर राहिला. या निकालामुळे दिव्यांग मैदानी क्रीडा प्रकारात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
संघर्षातून घडलेला सुवर्णवीर: दिलीप गावितचा प्रेरणादायी प्रवास
दिलीप महादू गावित हा नाशिकजवळील तोरण डोंगरी या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील युवक आहे. बालपणी झालेल्या एका अपघातामुळे त्याच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी झाडावरून पडल्याने त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने संसर्ग वाढला आणि अखेर कोपराखालील हात कापावा लागला.
मात्र, या कठीण प्रसंगाने खचून न जाता समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी दिलीपने धावण्याची आवड जपली. गावातील मातीच्या रस्त्यांवर सराव करत त्याने स्वतःला घडवले. त्याची क्षमता ओळखून प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी त्याला योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर दिलीपने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे.
एका छोट्याशा ग्रामीण भागातून जागतिक दर्जाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास अनेक युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारा आहे. कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या बळावर कोणतीही अडचण यशाच्या मार्गातील अडसर ठरू शकत नाही, हेच दिलीप गावितने आपल्या सुवर्ण कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.

COMMENTS