मुंबई: राज्यातील शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहज, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने नागरी आर

मुंबई: राज्यातील शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहज, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने नागरी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आयुक्तालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय आणि धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
‘शहरी आयुक्तालयाची प्रशासकीय संरचना’ आणि ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियान नागरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, अतिरिक्त अभियान संचालक जगन्नाथ वीरकर, सहसंचालक दीप्ती देशमुख-पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले की, वेगाने वाढणाऱ्या नागरी लोकसंख्येच्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने नागरी आरोग्य व्यवस्थेचा व्यापक आराखडा तयार केला आहे. प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा वेळेत मिळावी, यासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. शहरस्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उणिवा दूर कराव्यात आणि प्रत्येक स्तरावर समाधानाभिमुख (Solution Oriented) कार्यपद्धती स्वीकारावी, असे निर्देश त्यांनी दिले.
राज्यात सध्या २९ महानगरपालिका आणि ३९९ नगरपरिषदा, नगरपंचायती व कटक मंडळे अशा एकूण ४२८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य सेवा विस्ताराचे काम सुरू आहे. या क्षेत्रांमध्ये २,९३२ नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे व ‘आपला दवाखाना’, ८१८ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ४४ नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र तसेच इतर १०५ आरोग्य संस्था कार्यरत आहेत.
ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत नागरी आरोग्य संस्थांच्या कार्यान्वयनात लक्षणीय वाढ झाली आहे. नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरांची संख्या १,०४१ वरून २,००६ पर्यंत वाढली असून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रांची संख्या ४३२ वरून ६७४ पर्यंत पोहोचली आहे. अशाप्रकारे एकूण कार्यान्वित नागरी आरोग्य संस्थांची संख्या २,५३८ वरून ३,७६७ इतकी झाली आहे.

COMMENTS