नांदेड : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात असताना नांदेड शहरातील नारायणा स्कूल येथे रविवारी झालेल्या शिष्यवृ

नांदेड : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात असताना नांदेड शहरातील नारायणा स्कूल येथे रविवारी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान अत्यंत धक्कादायक आणि असंवेदनशील प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे. चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत तब्बल 42 अंश तापमानात उघड्या मैदानावर बसून डबा खाण्यास भाग पाडल्याने संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नांदेड शहरातील विविध भागांतून अनेक विद्यार्थी या केंद्रावर आले होते. परीक्षा सुरू असताना मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना वर्गखोल्या, छायादार जागा किंवा शाळेच्या बागेतील सुरक्षित परिसर उपलब्ध करून देण्याऐवजी थेट उघड्या प्लेग्राउंडवर बसविण्यात आले. अंगावर कडक ऊन, तापलेल्या जमिनीची झळ आणि उकाड्यामुळे लहान मुले घामाघूम झाली होती. अनेक विद्यार्थी बेचैन दिसत होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील शाळांची वेळ सकाळी 7 ते 11 अशी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनाने किमान मानवी संवेदनशीलता दाखवून मुलांना सावलीत बसण्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, दीड तास लहान विद्यार्थ्यांना उन्हात बसविण्यात आल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही पालकांनी सांगितले की, मुलांनी डबा खाताना पाणी, सावली आणि विश्रांतीची मागणी केली; परंतु व्यवस्थापनाकडून कोणतीही तत्पर दखल घेतली गेली नाही. परीक्षा केंद्रावर एवढ्या संख्येने विद्यार्थी असताना उष्णतेपासून संरक्षणासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा दिसून आली नाही, अशीही तक्रार करण्यात आली. या घटनेनंतर पालकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा किंवा इतर शालेय परीक्षांसाठी अशा निष्काळजी संस्थांना केंद्र देऊ नये, अशी ठाम भूमिका अनेकांनी मांडली आहे. दरम्यान, या प्रकरणाची शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होणार नाही, याची खात्री करावी, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणार्या संस्थांनी प्रथम त्यांच्या आरोग्याची आणि सन्मानाची काळजी घ्यावी, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

COMMENTS