Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

जुना नांदेडमध्ये मनपाची धडक कारवाई; चिकन, मच्छी, भाजी मार्केटसह बर्की चौकातील अतिक्रमणे हटवली

 नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी जुन्या नांदेड भागात मोठी धडक कारवाई करत इतवारा परिसरातील चिकन मार्केट, मच्छी

मुंबईच्या आरे कॉलनीतील जुन्या दर्ग्यावर बीएमसीने चालवला हातोडा; वारिस पठाण यांचा प्रशासनावर गंभीर आरोप
बीड शहरातील अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार
वांद्रे स्थानकाजवळील ‘गरिब नगर’ झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेची मोठी कारवाई; पुढील चार दिवस चालणार पाडकाम मोहीम



 नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी जुन्या नांदेड भागात मोठी धडक कारवाई करत इतवारा परिसरातील चिकन मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मार्केट तसेच ऐतिहासिक बर्की चौक परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटवली.
या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या परिसराला मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी मनपाच्या कारवाईचे स्वागत केले आहे. जुन्या नांदेडमधील इतवारा आणि बर्की चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा भाग मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून चिकन, मच्छी आणि भाजी मार्केट परिसरात रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच बर्की चौकात अनधिकृत हातगाड्या, तात्पुरती शेड, फ्लेक्स आणि रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहनधारकांसह पादचार्‍यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांकडून मनपाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी सकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली. अतिक्रमण पथकाने चिकन आणि मच्छी मार्केट परिसरातील रस्त्यावर उभारलेले अनधिकृत ओटे, लोखंडी जाळ्या, शेड आणि इतर साहित्य हटवून जप्त केले. भाजी मार्केट परिसरात रस्त्याची जागा व्यापून बसलेल्या विक्रेत्यांचे साहित्य हटवण्यात आले. तर बर्की चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या हातगाड्या, फ्लेक्स आणि तात्पुरती अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. ही कारवाई पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती, पोलीस उपनिरीक्षक आवटे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, पथक प्रमुख विशाल सोनकांबळे आणि मनपाचे सुमारे 30 कर्मचारी तसेच पोलीस विभागातील 20 कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले. मनपा प्रशासनाने संबंधित दुकानदार आणि विक्रेत्यांना पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच साहित्य जप्त करून थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर इतवारा आणि बर्की चौक परिसरातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील इतर भागातही अतिक्रमणाविरोधात अशीच धडक मोहीम पुढे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS