Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीला खा. बजरंग सोनवणे यांचा पाठिंबा

महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात न्याय्य हक्क मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी बीड येथे दि. 17 एप्रिल 2026 रोजी भव

शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन उत्साहात संपन्न
पाथर्डी – गेवराई बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकात उत्साह
निसर्ग प्रेमी रमाकांत डेरे यांच्या प्रकल्पांना परदेशी अभ्यासाकांची भेट



महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात न्याय्य हक्क मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी बीड येथे दि. 17 एप्रिल 2026 रोजी भव्य मुस्लिम आरक्षण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला खासदार बजरंग सोनवणे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाला मोठे बळ मिळाले आहे.
याबाबत सकल मुस्लिम आरक्षण कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या अधिकृत पत्रात खा. सोनवणे यांनी मुस्लिम समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण अत्यंत आवश्यक असून, ही मागणी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पत्रात पुढे त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील अनेक मागास व वंचित घटकांप्रमाणेच मुस्लिम समाजालाही समान संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची नैतिक व घटनात्मक जबाबदारी आहे. शिक्षण, रोजगार व आर्थिक उन्नती या क्षेत्रात मुस्लिम समाज मागे राहिल्याचे वास्तव लक्षात घेता, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, बीडमध्ये आयोजित करण्यात येणारा हा मोर्चा लोकशाही मार्गाने, शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या मोर्चामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यांचा देखील या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून घेऊन मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात या विषयावर राजकीय पातळीवरही हालचाली वेग घेण्याची चिन्हे आहेत. खा. सोनवणे यांनी आपल्या पत्रात या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देत, मोर्चा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

COMMENTS